पुणे महापालिकेचा हायड्रोजन PMPML बसमध्ये वापरला जाणार, प्रायोगिक तत्त्वावर ०.६ टन निर्मिती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2024 11:22 AM2024-04-24T11:22:16+5:302024-04-24T11:22:56+5:30
प्रायोगिक तत्त्वावर तयार होणारा हायड्रोजन पीएमपी बससाठी इंधन म्हणून वापरला जाणार आहे...
पुणे :पुणे महापालिकेने हायड्रोजन निर्मितीबाबत एक पाऊल पुढे टाकले आहे. प्रायोगिक तत्त्वावर ०.६ टन हायड्रोजनची निर्मिती केली जाणार आहे. प्रायोगिक तत्त्वावर तयार होणारा हायड्रोजन पीएमपी बससाठी इंधन म्हणून वापरला जाणार आहे.
पुणे महापालिका, वेरियट पुणे वेस्ट टू एनर्जी प्रायव्हेट लिमिटेड आणि द ग्रीन बिलियन्स लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून रामटेकडी येथील महापालिकेच्या जागेत भारतातील पहिला हायड्रोजन गॅस निर्मिती प्रकल्प उभारला जाणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण महामंडळाने हा प्रकल्प उभारण्यास परवानगी दिली आहे. शिवाय निरी, मुंबईच्या आयआयएमसारख्या संस्थांनी याबाबत सकारात्मक अहवाल दिला आहेत. मात्र, हा प्रकल्प पुढे जाताना दिसत नव्हता. केंद्र आणि राज्य सरकारने ग्रीन हायड्रोजन धोरण तयार केले आहे. त्यानुसार निधी मिळण्याबाबत महापालिकेने दोन्ही सरकारशी पत्रव्यवहार केला आहे. याबाबत अजून एक पाऊल पुढे जाण्यासाठी आणि आर्थिक बाबी तपासून पाहण्यासाठी महापालिकेच्या वतीने आर्थिक तांत्रिक विश्लेषण समितीची बैठक बोलावली होती. यात प्रकल्पाबाबत सकारात्मक चर्चा झाली.
या प्रकल्पात आम्ही निरीच्या अहवालानुसार एक एक टप्पा पुढे जाणार आहोत. त्यानुसार पहिला टप्पा हा प्रायोगिक तत्त्वावर असणार आहे. त्यात ०.६ टन हायड्रोजन निर्माण केला जाणार आहे. त्यात यशस्वी झाल्यावर २०० टन आणि शेवटी ३५० टनचा प्रकल्प केला जाणार आहे. त्यासाठी आधी आम्ही हा प्रस्ताव मंजुरीसाठी महापालिका आयुक्त यांच्यासमोर ठेवणार आहोत. रामटेकडी येथील प्रकल्पात तयार होणारा हायड्रोजन पीएमपीसाठी दिला जाणार आहे. त्याच्या वापराने इंधनाची किती बचत होईल, खर्च कसा वाचेल याची माहिती घेतली जाणार आहे.