स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांना पुणे महापालिका देणार अर्थसाह्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2021 04:09 AM2021-01-18T04:09:59+5:302021-01-18T04:09:59+5:30
पुणे : शहरात स्पर्धा देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेकडून अर्थसाह्य मिळणार आहे. ...
पुणे : शहरात स्पर्धा देण्याकरिता मोठ्या प्रमाणावर राज्यभरातून विद्यार्थी येत असतात. या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना पालिकेकडून अर्थसाह्य मिळणार आहे. यूपीएससी व एमपीएससीची पूर्वपरीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अंतिम परिक्षेच्या अभ्यासासाठी लागणाऱ्या संदर्भ ग्रंथ व पुस्तकांच्या खरेदीसाठी १०० विद्यार्थ्यांना पाच हजार रुपयांची मदत केली जाणार आहे. महिला व बालकल्याण समितीच्या बैठकीत याबाबत ठराव मंजूर केला आहे.
समितीच्या बैठकीमध्ये या विषयावर चर्चा झाली. अर्थसाह्य देताना काही अटीही घातल्या आहेत. हे अर्थसाहाय्य एक वेळेसच मिळणार असून, ते विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट जमा होणार आहे. त्याचे बिल अर्जदाराला अर्ज करतेवेळी सादर करावे लागेल. योजनेचा लाभ मिळविण्याकरिता संबंधित विद्यार्थ्यांच्या कुटुंबाचे वास्तव्य किमान तीन वर्षे पुण्यात असावे. कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत असावे, अशा अटी घातल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या वयाची मर्यादा खुल्या गटासाठी ३८ वर्षे तर मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी ४३ वर्षे ठेवली आहे. पालिकेच्या समाजविकास विभागामार्फत या योजनेची अंमलबजावणी केली जाणार असल्याचे समितीच्या अध्यक्षा माधुरी सहस्रबुद्धे यांनी सांगितले.
===
स्पर्धा परीक्षा देणारे बरेचसे विद्यार्थी नोकरी करून अभ्यास करत असतात. त्यामुळे अभ्यासिकेत जाऊन अभ्यास करणे त्यांना वेळेअभावी शक्य होत नाही. घरी अभ्यास करण्यासाठी गरीब विद्यार्थ्यांना स्वत:ची पुस्तके उपलब्ध होणे आवश्यक आहे. गरजू विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली, तर त्यांच्या गुणवत्तेत नक्की भर पडेल.
- माधुरी सहस्रबुद्धे, अध्यक्षा, महिला व बालकल्याण समिती