खड्डे बुजवण्यासाठी पुणे महापालिकेला आली जाग; PM मोदींचा ताफा जाणाऱ्या मार्गावर दुरुस्ती, 'असा' असेल मार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2023 02:52 PM2023-07-30T14:52:03+5:302023-07-30T14:53:10+5:30
PM Modi- पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुणेकरांना काही मार्गांवर तरी खड्डेमुक्त व स्वच्छ मार्गावरून प्रवास करता येणार
पुणे: पावसाळ्यात पडणारे खड्डे, रस्त्यांची दुरवस्था, अतिक्रमणे यामुळे पुणेकर त्रस्त असताना या समस्या सोडविण्यात नेहमी उदासिनता दाखविणारी महापालिका आता जागी झाली आहे. केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी ज्या मार्गाने प्रवास करणार आहेत, त्या मार्गावरील अतिक्रमणे काढण्यासाठी आणि रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी पालिका सरसावली आहे.
पुणे महापालिकेकडून शहरातील मध्यवर्ती भागातील रस्ते दुरुस्तीसाठी अधिकचे मनुष्यबळ तैनात करून युद्धपातळीवर गेल्या दोन दिवसांपासून काम केले जात आहे. यामध्ये रस्त्यावरील अतिक्रमणे काढणे, रस्त्यावर आलेल्या झाडांच्या फांद्या हटविणे, रस्ते स्वच्छ करणे, पदपथांची दुरूस्ती, मार्गावरील साइड मार्किंग करणे, चेंबरची झाकणे दुरुस्त करणे आदी कामे केली जात आहेत. याचबरोबर पाऊस पडल्यावर कुठेही चिखल राहणार नाही, याची दक्षता घेण्यात येत असून, त्या दृष्टीने संबंधित रस्ता कसा सुधारता येईल? यावर काम केले जात आहे.
पंतप्रधानांचा दौरा नक्की होताच पुणे पोलिसांनी महापालिकेला पंतप्रधानांच्या संभाव्य मार्गावरील व पर्यायी मार्गावरील रस्त्यावर आलेले वायरिंग हटविणे, तुटलेले खांब काढणे, खांबावरील जाहिराती, फ्लेक्स काढणे याबाबत सूचना दिल्या आहेत. त्यानुसार आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या गाड्या शहरातील रस्त्यांवर फिरू लागल्या आहेत. काही असो पण पंतप्रधानांच्या दौऱ्यामुळे पुणेकरांना काही मार्गांवर तरी खड्डेमुक्त व स्वच्छ मार्गावरून प्रवास करता येणार आहे.
असा असेल संभाव्य मार्ग
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १ ऑगस्ट रोजी पुण्यात येत असून, त्यांच्या नियोजित कार्यक्रमात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन, एस. पी. कॉलेज येथील टिळक पुरस्कार वितरण कार्यक्रम व शिवाजीनगर पोलिस परेड ग्राऊंड येथील महापालिकेच्या कार्यक्रमाला उपस्थिती असे तीन कार्यक्रम आहेत. यासाठी ते सिंचननगर येथील हॅलिपॅडवर हेलिकॅाप्टरने उतरणार असून, ते विद्यापीठ रस्त्याने शिवाजीनगर, शिवाजी रस्ता, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, लक्ष्मी रस्ता, अलका टॉकीज चौक, टिळक रस्त्याने एस. पी. कॉलेज व तेथील कार्यक्रम संपल्यावर एफ. सी. रोडने शिवाजीनगर व तेथून पुन्हा सिंचन भवन येथे जाणार असल्याची माहिती समजत आहे.
ज्या मार्गावरून पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जाणार आहे, त्या रस्त्यावर वर्दळीच्या ठिकाणी बॅरिकेट्स लावून वाहतूक वळविली जाणार आहे. वरील सर्व मार्गांवरील वाहतूक काही वेळ थांबविली जाणार असल्याने पुणेकरांना येत्या मंगळवारी सकाळी दहा वाजल्यापासूनच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.