महापालिकेच्या साहित्य पुरस्कारांची घोषणा मे अखेरीस
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 05:07 PM2019-04-13T17:07:31+5:302019-04-13T17:19:16+5:30
पुणे महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांची घोषणा येत्या मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे.
पुणे : महापालिकेच्यावतीने सुरु करण्यात आलेल्या साहित्य पुरस्कारांची घोषणा येत्या मे अखेरीस किंवा जूनच्या पहिल्या आठवड्यात केली जाण्याची शक्यता आहे. विविध प्रकाशक, लेखक-कवींमार्फत आलेल्या पुस्तकांची छाननी आणि परिक्षणाचे काम जवळपास ९० टक्के झाले आहे. हे काम लवकरच पूर्ण होणार असून आचारसंहिता संपल्यानंतर या पुरस्कारांची घोषणा केली जाणार आहे.
महापालिकेच्यावतीने मराठी भाषा संवर्धन समितीची २०१२ साली स्थापना करण्यात आली. महापौर या समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. आजवर समितीमार्फत महापालिकेच्या विविध उद्यानांमध्ये तीन साहित्य कट्ट्यांचे आयोजन करण्यात आलेले आहे. यासोबतच मराठी ग्रंथ महोत्सव, कवी संमेलन, साहित्य पुरस्कार वितरण कार्यक्रम प्रस्तावित आहेत. समिती अध्यक्ष या नात्याने महापौर मुक्ता टिळक यांनी सर्व प्रकाशकांना पत्र पाठवून साहित्य पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन केले होते. दोन वर्षांचे पुरस्कार एकत्रच देण्यात येत असल्याने १ जानेवारी २०१५ ते डिसेंबर २०१५ आणि १ जानेवारी २०१६ ते डिसेंवर २०१६ या कालावधीमधील पुरस्कारांचे वितरण आचारसंहिता संपल्यानंतर करण्यात येणार आहे.
पालिकेकडून अकरा प्रकारच्या साहित्य प्रकारांसाठी पुरस्कार दिले जातात. कथा, कादंबरी, कविता, नाटक, बालसाहित्य, नवोदित साहित्यिकांचे पहिले पुस्तक, मुद्रित शोधक, मोडी लिपी अनुवादक, आर्थिक विषयक लेखन, विज्ञान विषयक लेखन आणि आंतरराष्ट्रीय भाषांमधील पुस्तकांचे मराठी अनुवाद अशा प्रकारांमध्ये हे पुरस्कार दिले जातात. पुरस्कारप्राप्त व्यक्तींना २५ हजार रुपये आणि मानचिन्ह दिले जाते. पालिकेकडून २०१५-१६ या दोन्ही वर्षांचे साहित्य पुरस्कार घोषित न झाल्याने साहित्य वर्तुळामधून नाराजी व्यक्त केली जात होती. एकूण २४ सदस्य असलेल्या मराठी भाषा संवर्धन समितीमध्ये पालिकेचे १३ सदस्य नगरसेवक आहेत. तर ११ तज्ञ सदस्य आहेत. यामध्ये ग्रंथालय चळवळ, भाषा शास्त्रज्ञ, साहित्यिक, स्वयंसेवी संस्था, भाषा प्रसारक अशा क्षेत्रात काम करणाºया व्यक्तींचा समावेश आहे.
महापौरांनी प्रकाशकांना पुरस्कारांसाठी प्रस्ताव पाठविण्यासंदर्भात २०१७ मध्ये पत्र पाठविले होते. त्यानंतर विविध प्रकाशक, कवी, लेखकांकडून १५४ पुस्तके पुरस्कारांसाठी पाठविण्यात आली होती. या पुस्तकांची तज्ञांमार्फत छाननी आणि परिक्षण करुन घेण्यात आले आहे. पुरस्कारांसाठी प्रकाशक, लेखक आणि कवी हे पालिका हद्दीतील रहिवासी असावेत अशी अट आहे. पुरस्कारांची घोषणा झाल्यानंतर त्याचे वितरण करण्यात येणार आहे.