पुणे महापालिकेच्या मिळकत कर वसुलीत गतवर्षीपेक्षा ११४ कोटींची घट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2020 08:57 PM2020-04-24T20:57:12+5:302020-04-24T20:57:25+5:30
दरवर्षी मार्च महिन्यानंतर शहरातील मिळकत करधारकांना ३१ मेपर्यंत थकीत मिळकत कर भरण्यासाठी सवलत दिली जाते.
पुणे : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी पुकारण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, पुणे महापालिकेचा सर्वात महत्वाचा उत्पन्नस्त्रोत असलेल्या मिळकत कर वसुलीत यंदा तब्बल ११४ कोटींची घट झाली आहे.
पुणे महापालिकेच्या करसंकलन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी मार्च महिन्यानंतर शहरातील मिळकत करधारकांना ३१ मेपर्यंत थकीत मिळकत कर भरण्यासाठी सवलत दिली जाते. यामध्ये २५ हजारापर्यंत थकबाकी असलेल्यांना १० टक्के तर २५ हजारापेक्षा जास्त थकबाकी असलेल्यांना ५ टक्के सवलत दिली जाते. या काळात इतर महिन्यांच्या तलुनेत मोठ्या प्रमाणात मिळकत कर जमा होत असतो. गेल्यावर्षी २४ एप्रिलपर्यंत १९२ कोटी रुपये मिळकत कर जमा झाला होता.मात्र, यंदा तो केवळ ७८ कोटी रुपये इतका जमा झाला आहे.
लॉकडाऊनमुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्याने हा परिणाम दिसून आला. मार्च अखेरीस पुकारण्यात आलेल्या या लॉकडाऊनमुळे केवळ सव्वा कोटी रुपये पालिकेच्या मुख्य इमारतीतील मिळकत कर भरणा केंद्रामध्ये जमा होऊ शकला आहे. अन्यत्र असलेल्या सर्व मिळकत कर भरणा केंद्र बंद असल्याने अनेकांनी ऑनलाईनचा वापर केल्याने हा आकडा ७८ कोटीपर्यंत पोहचला आहे. दरम्यान, दरवर्षीप्रमाणे ३१ मेपर्यंत मिळकत कर भरणा करणाºया ५ व १० टक्के सवलत चालू राहणार असल्याचेही कर संकलन विभागाकडून सांगण्यात आले़.