पुणे महापालिकेच्या ‘आयडब्ल्यूएमएस’ला द्वितीय क्रमांक; राज्य सरकाराचे ६ लाखांचे बक्षीस जाहीर
By राजू हिंगे | Updated: March 26, 2025 20:10 IST2025-03-26T20:09:21+5:302025-03-26T20:10:16+5:30
पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या पुढाकारातून ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणाली महापालिकेत आणली

पुणे महापालिकेच्या ‘आयडब्ल्यूएमएस’ला द्वितीय क्रमांक; राज्य सरकाराचे ६ लाखांचे बक्षीस जाहीर
पुणे: राज्य सरकारच्या राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२४- २५ मध्ये महापालिकास्तरावर पुणे महापालिकेच्या इंटेलिजंट वर्क मॅनेजमेंट सिस्टीम (आयडब्ल्यूएमएस) प्रणालीला द्वितीय क्रमांकाचे सहा लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. त्यामुळे पुणे महापालिकेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभाग राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता अभियान व स्पर्धा २०२४- २५ आयोजित केली होती. या स्पर्धसाठी राज्यातील महापालिकास्तर हा विभाग होता. त्यामध्ये पुणे महापालिका सहभागी झाली होती. त्यासाठी पुणे महापालिकेने ‘ आयडब्ल्यूएमएस प्रणाली सादर केली होती. या प्रणालीमुळे अंदाजपत्रकातील तरतुदीनुसार पूर्वगणक पत्रक ते अंतिम बिलपर्यंतची सर्व कामे ऑनलाइन करण्यात येत आहे. या मध्ये पुणे महापालिकेच्या ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणालीला द्वितीय क्रमांकाचे सहा लाख रुपयांचे पारितोषिक जाहीर झाले आहे. पुणे महापालिकेचे आयुक्त डॉ. राजेद्र भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या पुढाकारातून ‘आयडब्ल्यूएमएस’ प्रणाली महापालिकेत आणली आहे. सामाजिक उत्तरदायित्व निधीतून (सीएसआर) सव्वा कोटी रुपये देऊन पालिकेने ही प्रणाली तयार करून घेतली आहे.
आयडब्ल्यूएमएसचा असा आहे फायदा
महापालिकेत एकच काम एकाच ठिकाणी वारंवार करणे, काम न करता बिल काढणे, काम एका ठिकाणी अन् ते केले. दुसऱ्याच ठिकाणी, कामाची गुणवत्ता तपासली की नाही, याची माहिती एकत्र मिळत नसल्याने सावळा गोंधळ दिसून येतो. आता हा प्रकार कमी या प्रणालीमुळे कमी झाला आहे. २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या तीन वर्षांत संगणकीय प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. यामध्ये पथ, भवन रचना, मलनिःसारण, उद्यान, विद्युत यासह अन्य विभाग, १५ क्षेत्रीय कार्यालये, परिमंडळ कार्यालयांचा समावेश केला आहे. विकासकामे किंवा देखभाल-दुरुस्तीच्या कामांचे पूर्वगणन पत्रक तयार करणे, प्रस्ताव तयार करणे, प्रस्तावाला मान्यता घेणे, कामाचे कार्यादेश देणे, कामाची गुणवत्ता तपासणे, त्यानंतर त्याचे बिल देणे ही कामे अभियंते करत आहेत. त्यामुळे त्यांच्या वेळेत बचत होत आहे.