पुणे महापालिकेचे रखडलेले पुरस्कार सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 07:19 AM2018-06-02T07:19:37+5:302018-06-02T07:19:37+5:30
सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा महानगरपालिकेतर्फे पुरस्काराद्वारे सन्मान करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
पुणे : सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुणे शहरातील दिग्गज व्यक्तिमत्त्वांचा महानगरपालिकेतर्फे पुरस्काराद्वारे सन्मान करण्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. सांस्कृतिक राजधानी असे बिरुद मिरवणाऱ्या पुणे शहरातील सांस्कृतिक पुरस्कारांनाच सध्या ग्रहण लागल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रसिद्ध केले होते. या पार्श्वभूमीवर गतवर्षी रखडलेले आणि यंदाच्या १७ पुरस्कारांचे वितरण लवकरच करण्याचा निर्णय पक्षनेत्यांच्या बैैठकीत पालिकेतर्फे घेतला आहे. त्यामुळे आता संत जगनाडे महाराज, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, स्वरभास्कर आदी पुरस्कारांच्या वितरणाचा मार्ग सुकर झाला आहे.
सांस्कृतिक कार्यक्रमांवर होणारी उधळपट्टी रोखावी, राज्य शासनाच्या आदेशानंतर पुणे महानगरपालिकेने पुरस्कारांनाच कात्री लावली होती. याबाबत सांस्कृतिक क्षेत्रातून तीव्र नाराजी व्यक्त केली होती. महापौरांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पाठपुरावा करावा, अशी मागणी केली होती. महानगरपालिकेतर्फे देण्यात येणारे तब्बल आठ पुरस्कार रखडले होते. याबाबत माजी उपमहापौैर आबा बागुल यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. पुणे पक्षनेत्यांच्या बैठकीत पुरस्कार वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.
पुणे शहराला अनेक दिग्गज व्यक्तिमत्त्वे लाभली आहेत. गेल्या ७० वर्षांत त्यांच्या कार्याप्रती आदर आणि नव्या पिढीला प्रेरणा मिळावी यासाठी त्या व्यक्तींच्या नावाने विविध क्षेत्रांत योगदान देणाºयांचा सन्मान महापालिकेतर्फे करण्यात येतो. राज्यशासनाच्या एका परिपत्रकामुळे या परंपरेत खंड पडल्याने आठ-नऊ महिने या पुरस्कारांचे वितरण थांबले होते. कायद्यातील तरतुदींकडे वारंवार लक्ष वेधून हे पुरस्कार सुरू करण्याची मागणी केली होती. पक्षनेत्यांच्या बैठकीत हे रखडलेले पुरस्कार पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आल्याने सांस्कृतिक क्षेत्रातून समाधान व्यक्त केले जात आहे.