पुणे महापालिकेच्या कारभारातला सावळा गोंधळ सुरुच; कोरोना रुग्णांची होतेय दुबार नोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2020 07:26 PM2020-08-29T19:26:48+5:302020-08-29T19:30:06+5:30
नुकताच शेकडो कोरोना रुग्णांचे अहवालच बदलले जाण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
पुणे : कोरोना रुग्णांचे आकडे दिवसागणिक वाढत असतानाच पालिकेच्या कारभाराचा गोंधळ सुरुच आहे. एकाच रुग्णाची दोनदा नोंदणी होत असल्याचे समोर आले असून यामुळे रुग्णसंख्या अधिक दिसत असल्याचे पोलिसांनी पालिकेच्या निदर्शनास आणून दिले आहे. तसे पत्रच पुणेपोलिसांनी महापालिकेला पाठविले आहे.
शहरातील नागरिकांची घशातील द्रावाची (स्वाब) तसेच रॅपिड अॅन्टीजेन चाचणी केली जाते. या चाचण्यांमध्ये पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांची यादी पोलिसांकडेही पाठविली जाते. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि रुग्ण शोधण्यासाठी पोलिसांना या यादीची मदत मिळते. पालिकेकडून पोलिसांना पाठविल्या जाणाऱ्या यादीमध्ये संक्रमित रुग्णांची नावे, मोबाईल क्रमांक दिलेले असतात. या यादीमध्ये शेकडो रुग्णांची नावे आणि मोबाईल क्रमांक समान असल्याचे दिसून आले आहे.
ऑगस्ट महिन्यामध्ये देण्यात आलेल्या याद्यांमध्ये हा गोंधळ झाल्याचे निदर्शनास आले आहे. ६ ऑगस्टच्या यादीमध्ये पालिकेने १०१० रुग्णांची यादी दिली होती. यासोबतच अँटिजेन रुग्णांची संख्या ४९५ होती. दोन्हीमधील समान रुग्णांची संख्या ४७६ होती. प्रत्यक्षात नवीन रुग्णांची संख्या एकोणीसच होती. जवळपास ४७६ रुग्णसंख्या वाढलेली आहे. तर, ७ ऑगस्टच्या अहवालात पालिकेची रुग्णसंख्या १६५४ होती. तर, अँटिजेन रुग्णांची संख्या ४७५ होती. यातील प्रत्यक्षात नवीन रुग्ण ९ होते. या आकडेवारीत ४६६ रुग्ण वाढल्याचे दिसत आहे.
असे प्रकार वारंवार घडत असून याबाबत पोलिसांनी आरोग्य विभागाला सुधारणा करण्याबाबत तसेच दुबार नोंदणी न करण्याबाबत कळविले आहे. आकड्यांमधील गोंधळाची ही माहिती पालिकेच्या यंत्रणेच्या लक्षात येणे गरजेचे होते. परंतू, ही बाब पालिकेच्या नव्हे तर पोलिसांच्या लक्षात आली. पालिकेकडून शासनाला पाठविण्यात येत नसलेल्या आकडेवारीचा घोळ अद्याप संपलेला नसताना वाढीव रुग्ण दाखविले जात असल्याचे समोर आले आहे. स्मार्ट सिटीकडूनही दोन दिवसांपुर्वी निगेटीव्ह रुग्णांची नावे पॉझिटीव्ह रुग्णांच्या यादीमध्ये टाकण्यात आली. तर, पॉझिटीव्ह रुग्णांची नावे निगेटिव्ह रुग्णांच्या यादीमध्ये कॉपी पेस्ट केली गेली. रुग्णांच्या आकडेवारीमध्ये अशा चुका घडू लागल्याने रुग्णसंख्येविषयीच शंका निर्माण होऊ लागल्या आहेत.