दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणार्या योजनांवरून पुणे महापालिकेतील नगरसेवक नाराज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2017 05:33 PM2017-12-20T17:33:33+5:302017-12-20T17:58:20+5:30
शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले.
पुणे : शहरातील वसाहतीमधील निराधार महिला, विद्यार्थी, व अन्य दुर्बल समाज घटकांसाठी राबवण्यात येणार्या योजनांवरून सर्वपक्षीय नगरसेवकांनी नागर वस्ती विभागाला धारेवर धरले.
इयत्ता १० वी १२ वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना देण्यात येणारे अनुक्रमे १५ व २५ हजार रुपये अद्याप मिळालेले नाहीत. त्यावर माजी महापौर दत्ता धनकवडे यांनी प्रश्न उपस्थित केला. त्यानंतर सर्वच नगरसेवकांनी या विभागावर कोरडे ओढण्यास सुरूवात केली. प्रभागांमधील समुह संघटिकांना दर ६ महिन्यांनी नोकरीतून ब्रेक दिला जात असल्याबद्धल तक्रार करण्यात आली. नव्या नियुक्त्या करून सलग १० वर्ष काम केलेल्यांना घरी बसवण्याचा प्रकार सुरू असल्याची टीका करण्यात आली.
सुभाष जगताप धीरज घाटे, अजित दरेकर, भैय्या जाधव, महेंद्र पठारे, स्वप्नाली सायकर, गफूर पठाण. दीपक मानकर, आरती कोंढरे, नाना भानगिरे, रघू गौडा, नंदा लोणकर, पल्लवी जावळे, मनिषा लडकत, प्रवीण चोरबेले, अजय खेडेकर, दीपाली धूमाळ, वसंत मोरे, संजय भोसले आदींनी या विषयावरील चर्चेत भाग घेतला. या विभागाचे काम असमाधानकारक असल्याची टीका केली. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, विरोधी पक्षनेते चेतन तुपे यांनीही प्रशासना या विभागाकडे लक्ष देत नसल्याबद्धल जबाबदार धरले.
विभाग प्रमचख संजय रांजणे यांनी खुलासा करताना विभागाकडे विविध योजनांसाठी असलेल्या निधीची माहिती दिली. तो न पटल्यामचळे अतिरिक्त आयुक्त प्रेरणा देशभ्रतार यांनी सविस्तर खुलासा केला.
अखेरीस महापौर मुक्ता टिळक यांनी मध्यस्थी करत प्रशासनाने हा विषय गंभीरपणे घ्यावा असे सांगितले. स्थायी समितीचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी या विषयावर सर्व गटनेत्यांची महापौर दालनात बैठक घ्यावी अशी सुचना केली. ती मान्य करण्यात आली. महापौरांनी नागरवस्ती विभागाच्या एकूण कारभाराबाबत शुक्रवारी पक्षनेत्यांची बैठक घेण्याचे जाहीर केले.