पुणे महापालिका निवडणूक: ओबीसी आरक्षणामुळे २४ प्रभागांतील जागांमध्ये बदल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2022 04:36 PM2022-07-30T16:36:50+5:302022-07-30T16:37:51+5:30

ज्यांनी निवडणुकीची आशा सोडली होती, त्यांना मोठी संधी....

Pune Municipal Election: Changes in seats in 24 wards due to OBC reservation | पुणे महापालिका निवडणूक: ओबीसी आरक्षणामुळे २४ प्रभागांतील जागांमध्ये बदल

पुणे महापालिका निवडणूक: ओबीसी आरक्षणामुळे २४ प्रभागांतील जागांमध्ये बदल

googlenewsNext

पुणे : महापालिकेच्या १७३ जागांसाठी शुक्रवारी नव्याने महिला आरक्षणासोबतच ओबीसींसाठीच्या राखीव ४६ जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यामुळे ३१ मे रोजी ओबीसी आरक्षणाशिवाय काढलेल्या सोडत काढलेल्या २४ प्रभागांमधील जागांमध्ये बदल झाले आहेत. नव्याने जाहीर झालेल्या अंतिम आरक्षणामुळे इच्छुकांना धक्का बसला असून, ज्यांनी निवडणुकीची आशा सोडली होती, त्यांना मोठी संधी निर्माण झाली आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या ओबीसी आरक्षणासंदर्भातील आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने बहुतांश महापालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुकीसाठी आरक्षण सोडत काढली. महापालिका आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, मुख्य निवडणूक अधिकारी उपायुक्त यशवंत माने यांच्या उपस्थितीत शालेय विद्यार्थ्यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिर येथे ही सोडत झाली. या सोडतीवर २ ऑगस्टपर्यंत हरकती व सूचना मागवून अंतिम अहवाल ५ ऑगस्टला राज्य निवडणूक आयोगाकडे पाठविणार असल्याची माहिती आयुक्त विक्रम कुमार यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

पुणे महापालिकेच्या ५८ प्रभागांतील ४६ जागा या ओबीसी प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. याचा सर्वाधिक फटका भाजपच्या नगरसेवकांना बसणार असल्याचे बोलले जात आहे. तर शहरातील काही भागांमध्ये आजूबाजूच्या प्रभागांतील खुल्या प्रवर्गासाठीच्या जागा देखील ओबीसी प्रवर्गासाठी राखीव झाल्याने उमेदवारी मिळविण्यासाठी अनेकांचा कस लागणार आहे.

आरक्षणाचे चित्र स्पष्ट झाल्यानंतर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील प्रभाग क्रमांक १७ ( शनिवार पेठ - नवी पेठ ) येथे एक जागा ओबीसी महिला, दुसरी सर्वसाधारण महिला आणि तिसरी जागा खुल्या गटासाठी आरक्षित आहे. त्याचा फटका स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने यांना बसण्याची शक्यता आहे.

आरक्षणाचा फटका बसलेल्यांमध्ये रासने यांच्यासह माजी सभागृह नेते धीरज घाटे, पुणे महानगर परिवहन महामंडळाचे (पीएमपी) माजी संचालक शंकर पवार, माजी उपमहापौर प्रसन्न जगताप, माजी नगरसेवक पृथ्वीराज सुतार आदींचा समावेश आहे.

सात प्रभागात खुला गटच नाही

आरक्षणामुळे ७ प्रभागात खुला गट हे आरक्षण नसणार आहे. त्यामुळे याचा सर्वसाधारण खुला गटासाठी संधी नाही, त्याचा फटका खुल्या गटात विशेषत: पुरुष उमेदवारांना बसला आहे. यामध्ये प्रभाग क्रमांक २१ कोरेगाव पार्क मुंढवा प्रभाग क्रमांक ३ लोहगाव विमान नगर प्रभाग क्रमांक ३७ जनता वसाहत दत्तवाडी प्रभाग क्रमांक ३९ मार्केट यार्ड महर्षी नगर प्रभाग क्रमांक ४२ रामटेकडी सय्यद नगर प्रभाग क्रमांक ४६ मोहम्मद वाडी उरळी देवाची प्रभाग क्रमांक ४७ कोंढवा बुद्रुक येवलेवाडी या प्रभागांचा समावेश आहे. या ७ प्रभागांमध्ये तीनही जागांवर आरक्षण पडले आहे. या परिस्थितीमुळे आता राजकीय उलथापालट होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. आरक्षणामुळे शेजारचा प्रभाग किंवा घरातील महिला उमेदवारांना निवडणूक रिंगणात उतरावे लागणार आहे.

प्रभाग क्रमांक १६ ( फर्ग्युसन कॉलेज - एरंडवणे ) येथे माजी नगरसेवक दीपक पोटे यांची अडचण झाली आहे. या प्रभागातील एक जागा ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने नीलिमा खाडे यांना सेफ झाली आहे. त्याचवेळी येथून इच्छुक असलेल्या नगरसेविका ज्योत्स्ना एकबोटे, माधुरी सहस्त्रबुद्धे आणि मंजूषा खर्डेकर या तिघींची उरलेल्या एका जागेसाठीच स्पर्धा होणार आहे. पोटे यांनी आपण खुल्या जागेतून निवडणूक रिंगणात उतरणार असून, काही अडचण नसली तरी स्पर्धा अधिक असल्याचे मान्य केले आहे. तर प्रभाग क्रमांक २१ (कोरेगाव पार्क - मुंढवा ) येथे भाजपच्या महिला नगरसेविकांमध्ये उमेदवारीसाठी चढाओढ दिसून येत आहे.

Web Title: Pune Municipal Election: Changes in seats in 24 wards due to OBC reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.