पुणे महापालिका निवडणूक: गतनिवडणुकीच्या तुलनेत यंदा सव्वाआठ लाख मतदारांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2022 06:02 PM2022-06-25T18:02:22+5:302022-06-25T18:05:01+5:30
२०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत सध्या मतदारांची संख्या आठ लाखांनी वाढली...
पुणे : महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेल्या प्रभागनिहाय प्रारूप मतदारयादीनुसार, सहा प्रभागांमध्ये महिला मतदार निर्णायक मतदार ठरणार आहेत. या प्रभागात पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे, तर सन २०१७ च्या निवडणुकीच्या तुलनेत यावर्षी म्हणजेच सन २०२२ च्या निवडणुकीसाठी शहरातील मतदार संख्येत ८ लाख २३ हजार ९१६ ने वाढ झाली आहे.
महापालिका निवडणुकीसाठी महापालिकेच्या निवडणूक कार्यालयाने नुकतीच प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी जाहीर केली. या मतदार यादीवर १ जुलैपर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत. मतदारांनी त्यांची प्रभागनिहाय यादी पाहून नावाची पडताळणी करावी व आपले नाव आपल्या प्रभागात नसेल तर हरकत नाेंदवावी. मतदारांनी नाेंदविलेल्या हरकती आणि सूचनावर कार्यवाही करून ९ जुलैला अंतिम मतदार यादी जाहीर केली जाणार आहे, अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी मुख्य निवडणूक अधिकारी यशवंत माने उपस्थित हाेते.
प्रारुप मतदार यादीत महापालिका हद्दीबाहेरील गावांतील मतदारांचा समावेश झाला आहे. तसेच दुसऱ्या प्रभागाच्या यादीत नावे समाविष्ट केली गेल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात येत आहे. या पार्श्वभूमीवर बिनवडे म्हणाले, या त्रुटी दूर करण्यासाठी व बिनचूक मतदार यादी तयार करण्यासाठीच निवडणूक विभागाने हरकती व सूचना मागविल्या आहेत. नागरिकांना महापालिकेच्या https://www.pmc.gov.in या संकेतस्थळावर व क्षेत्रीय कार्यालयात प्रभागनिहाय प्रारुप मतदार यादी पाहण्यास उपलब्ध आहेत. त्यानुसार प्रभागाच्या मतदार यादीत आपले नाव आहे का ते तपासून मतदारांनी हरकत नोंदवावी. ही हरकत लेखी किंवा ऑनलाईन स्वरुपात मतदाराला महापालिकेच्या मुख्य निवडणुक कार्यालय, क्षेत्रीय कार्यालयात नाेंदविता येणार आहे. ऑनलाईन पद्धतीने हरकत महापालिकेच्या election@punecorporation.org या ई-मेलवर नाेंदविता येणार आहे.
मतदार यादीवर हरकत आल्यावर ही हरकत ही निवडणूक कार्यालयाकडून संबंधित क्षेत्रीय कार्यालयाकडे पाठविली जाणार आहे. या हरकतीची पडताळणी करण्यासाठी पथक नियुक्त केले असून, या पथकामध्ये क्षेत्रीय अधिकारी, अभियंता, लिपिक यांचा समावेश राहणार आहे. हे पथक प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन हरकतीची पडताळणी करूनच दुरुस्ती करणार आहे.