पुणे महापालिका निवडणुका: डोहाळ जेवणालाच घातलं जातंय बारसं! ऑनलाइन निवडणकीचा नुसता धुरळा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2022 12:51 PM2022-02-25T12:51:51+5:302022-02-25T12:53:12+5:30
सध्या सोशल मीडियावर कोण होणार नगरसेवक, याची मोठी धूम सुरू आहे...
पांडुरंग मरगजे
धनकवडी : हल्ली मोठ्या हाॅलमध्ये मोठा खर्च करून कंत्राटी पद्धतीचे डोहाळ जेवण केलं जातं. त्यामध्ये भावी आई-बाबांना 'इट्स बाॅय' किंवा 'इट्स गर्ल' अशी निवड करायची असते. आगोदर ठरल्याप्रमाणे हे भावी आई-बाबा ' इट्स बाॅय' या पर्यायाचीच निवड करतात. हल्ली सोशल मीडियावरसुद्धा हेच पहायला मिळतं. नगरसेवक होण्या अगोदरच सारं काही सेटिंग करून चाललेलं एक नाटक ( खरे तर नौटंकी) उत्तम प्रकारे सुरू आहे. त्यामुळे ऑनलाइन निवडणूकीचा नुसताच फाssर्स, डोहाळ जेवणालाच घातलं जातंय बारसं, असं म्हटल्याशिवाय रहावत नाही.
सध्या सोशल मीडियावर कोण होणार नगरसेवक, याची मोठी धूम सुरू आहे. आपली पहिली पसंती कोणाला? कोण निवडून येणार? पुरुष/महिला गटातून कोण उमेदवार असणार? असे एक ना अनेक प्रश्नांचे सध्या शहरासह दक्षिण उपनगरात ऑनलाइन पोलचे पेव फुटले असून इच्छुक उमेदवार आणि कार्यकर्ते सोशल मीडियावर सध्या जोरदार बॅटिंग आणि सेटिंग करण्यात मग्न झाले आहेत.
खरं पाहिलं तर असल्या प्रकारामुळे जनतेची दिशाभूल होण्याचीच अधिक शक्यता निर्माण झाली आहे. परंतु या प्रकाराला आळा घालणारा कोणताही कायदा सध्या तरी अस्तित्वात नाही. त्यामुळे चुकीच्या पोलमुळे अनेकांची फसगत होताना दिसत आहे. ज्यांनी पोल बनविला त्यांनाच मते जास्त जात असल्याने ऑनलाइन सुद्धा फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येत आहे. त्यामुळे या मतांचे देखील मॅचफिक्सिंग असल्याची चर्चा दक्षिण उपनगरात सुरू आहे.
पुणे महापालिका निवडणूक प्रभाग रचना जाहीर झाली आणि इच्छुकांकडून आडाखे बांधण्यास सुरूवात झाली, कार्यक्रम, वाढदिवस, सहली आणि भेट वस्तूंचे वाटप करणाऱ्या महिलांचे कार्यक्रम यामाध्यमातून जोरदार प्रचार सुरू आहे. त्यातच निवडणूक नियोजन करणाऱ्या टीमने मत पसंती सर्व्हेचा नवा फंडा बाजारा त आणला आहे. भावी नगरसेवकांनी आपले कार्यकर्ते या कामाला जुंपले आहेत.
नेटकऱ्यांकडून टोचले जातायत कान-
सध्या सोशल मीडियावर आपणास कोणता उमेदवार योग्य वाटतो, असा प्रश्न उपस्थित केला असता. घराणेशाहीचा वारसा चालवणारा? कमिशन खाणारा? गावातली विकासकामे स्वतःच्या मतलबासाठी अडवून नागरिकांना वेठीस धरणारा? सरकारी जमिनीवर कब्जा करून मोठी कमाई करणारा? मतदारांना भेटवस्तू देणारा? कचरा डेपो आणणारा? बेकायदेशीर सावकारी करणारा? सरळमार्गी पैशाची उधळपट्टी न करता आचारसंहितेचे पालन करणारा? अशा प्रतिप्रश्नाद्वारे नेटकऱ्यांकडून भावी नगरसेवकांची कानटोचणी केली जात आहे.