पुणे महापालिकेच्या आरोग्य परवाना शुल्कात वाढ होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2020 02:32 PM2020-01-06T14:32:16+5:302020-01-06T14:42:56+5:30
महापालिका प्रशासनाच्या विविध विभागाच्या वतीने वेगवेगळ्या स्वरुपांचे परवाने..
पुणे : महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील लॉजिंग, मंगलकार्यालय, सलून, ब्यूटी पार्लर, अंडाविक्री, धान्यभट्टी, आईस फॅक्ट्री, पानपट्टी, रसगुल्ला, घरगुती वापरासाठी पाळीव जनावरे व खासगी जनावरे यांच्यासाठी आदी सर्वांना आरोग्य परवाने दिले जातात. या परवान्यांच्या शुल्कामध्ये वाढ करण्याचा प्रस्ताव महापालिका प्रशासनाच्या वतीने स्थायी समिती समोर मान्यतेसाठी ठेवला आहे. येत्या मंगळवारी (दि.७) होणाऱ्या स्थायी समितीच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे.
महापालिका प्रशासनाच्या विविध विभागाच्या वतीने वेगवेगळ्या स्वरुपांचे परवाने दिले जातात. आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या परवाना शुल्कामध्ये सन २००५ पासून कोणत्याही स्वरूपाची वाढ केली नाही. परंतु आता येत्या १ एप्रिलपासून आरोग्य परवाने नवीन शुल्कवाढीनुसार देणार आहे. त्यासाठी प्रशासनाने सुधारित दर प्रस्तावित केले आहेत. तसेच त्यानंतर दर तीन वर्षांनंतर परवाना फीमध्ये पाच टक्के वाढ करण्याचे प्रस्तावित केले आहे. आरोग्य परवाना फी व्यतिरिक्त नूतनीकरणाच्या वेळी विलंब फी आणि तडजोड फी आकारली जाते. सध्या विलंब फी ६ रुपये आणि तडजोडी फी परवाना फीच्या २५ टक्के आहे.
आता या विलंब फीमध्ये वाढ प्रस्तावित करुन ३० रुपये केली आहे, मात्र तडजोड फीमध्ये कुठल्याही प्रकारे वाढ केलेली नाही. आरोग्य परवाना फॉर्मचे शुल्क एक रुपयावरून दहा रुपये केले आहे.
हंगामी उसाचे गुऱ्हाळ चारशे रुपयावरुन दोन हजार आणि कायम स्वरूपी उसाचे गुऱ्हाळ सहाशेवरुन दोन हजार रुपये शुल्क सुचविले आहे.
नसबंदी केलेल्या कुत्र्याला पन्नासवरुन अडीचशे रुपये, नसबंदी न केलेला कुत्र्यासाठी परवाना शुल्क पाचशे रुपये आकारण्यात येईल, असे आयुक्त सौरभ राव यांनी प्रस्तावात नमूद केले आहे.
...
आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येणाऱ्या परवाना शुल्कामध्ये सन २००५ पासून कोणत्याही स्वरूपाची वाढ केली नाही.
........
प्रस्तावित दर व वाढीव दर
व्यवसायाचे नाव सध्याचे दर प्रस्तावित दर
हेअर कटिंग ५० २५
ब्यूटी पार्लर ४०० २०००
पानपट्टी ८० ४००
अंडा विक्री ८० ४००
पोल्ट्री ३५० १७५०
धान्य भट्टी २०० १०००
मंगल कार्यालय
२०० चौरस ३००० १५०००
२०० चौरस मीटर पुढे ५००० २५०००
........
४शहरात गाय, म्हैस, बैल, रेडा यांच्यासाठी प्रतिजनावर ४० रुपये शुल्क होते. ते आता दोनशे रुपये केले जाणार आहे. घोड्याच्या तडजोड फीचे ऐंशीवरुन चारशे, हत्तीचे शंभर रुपयावरुन पाचशे रुपये, शेळ्या-मेंढ्यांचे शुल्क शंभरवरून दोनशे रुपये प्रस्तावित केले आहे.