पुणे-नगर मार्गावरील कोंडी फुटणार
By admin | Published: April 13, 2016 03:26 AM2016-04-13T03:26:51+5:302016-04-13T03:26:51+5:30
वाघोली ते शिक्रापूरदरम्यान सहापदरी रस्त्यासाठी १५ कोटींचा तत्काळ निधी देतानाच या मार्गावरील वाहतूककोंडी कायमची सोडविण्यासाठी ५३३.२५ कोटींच्या वाघोली,
कोरेगाव भीमा : वाघोली ते शिक्रापूरदरम्यान सहापदरी रस्त्यासाठी १५ कोटींचा तत्काळ निधी देतानाच या मार्गावरील वाहतूककोंडी कायमची सोडविण्यासाठी ५३३.२५ कोटींच्या वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूर या तीन गावांमध्ये उड्डाणपुलांची निर्मिती करण्याच्या योजनेस हिरवा कंदील दाखविला. पुणे-नगर मार्ग केंद्र सरकारकडेही वर्ग करण्याचे संकेत सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी सभागृहात दिले.
पुणे-नगर महामार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासंदर्भातील लक्षवेधी आमदार बाबूराव पाचर्णे यांनी विधानभवनात मंगळवारी मांडली याला उत्तर देताना पाटील यांनी नियोजन सांगितले.
२००५ मध्ये या मार्गाचे ‘बांधा वापरा, हस्तांतरित करा’ या तत्त्वावर नूतनीकरण करण्यात आले. परंतु रस्ता तयार करताना अतिक्रमणावर कारवाईही झाली नाही; शिवाय सर्व्हिस रस्ताही नसल्याने काही वर्षांतच या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या प्रकर्षाने जाणवू लागली. दरम्यान, या मार्गावर होणाऱ्या वाहतूककोंडीचा कोरेगाव भीमा, सणसवाडी, शिक्रापूर व रांजणगाव औद्योगिक क्षेत्रालाही फटका बसत असतानाच कामगारांचाही प्रवासामध्ये दररोज तीन ते चार तास जास्त वेळ खर्च होत होता. यासंदर्भात डेक्कन चेंबर्स आॅफ कॉमर्स इंडस्ट्रीज व अॅग्रीकल्चरनेही मुख्यमंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांनाही निवेदन दिले होते. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासन व औद्योगिक कारखानदारांच्या माध्यमातून गेल्या दोन वर्षांपासून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरून अष्टविनायकातील रांजणगाव गणपती देवस्थानसह मराठवाडा व विदर्भात जाण्यासाठी हाच मार्ग असल्याने या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचे प्रमाणही वाढले आहे.
पुणे-नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर होणारी वाहतूककोंडी सोडविण्यासाठी पाचर्णे यांनी हा मार्ग सहापदरी करण्याबरोबरच उड्डाणपूल उभारण्यासंदर्भात लक्षवेधी मांडत, सरकारचे लक्ष केंद्रित केले होते.
पाचर्णे यांनी या रस्त्यासंदर्भातील असणारी वाहतूक व त्याप्रमाणात नसलेला रस्ता याचे चित्र मांडले. शासनाकडे वाघोली ते शिक्रापूर असा २६ किलोमीटरचा उड्डाणपूल बांधण्याचा २२०० कोटींचा प्रस्ताव बांधकाम विभागाने दाखल केला होता; मात्र हा प्रस्ताव शासनाच्या पायाभूत समितीने फेटाळला.
आता वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूर या तीनच गावांमध्ये तीन स्वतंत्र उड्डाणपूल करण्याचा ५३३.२५ कोटींचा प्रस्ताव तयार करून त्यास जिल्हा नियोजन मंडळाच्या मंजुरीनंतर शासनाकडे पाठविण्यात येईल, असे सांगितले. पुणे-नगर मार्गावरील वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उड्डाणपूल व सहापदरी रस्ता केला, तरच वाहतूककोंडी सुटेल, हे सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले. यावर पाटील यांनी वाघोली ते शिक्रापूर या सहापदरी रस्त्यासाठी १५ कोटी निधी टाकण्यास मंजुरी दिली. वाघोली, कोरेगाव भीमा, शिक्रापूर येथे उड्डाणपुलाचे काम तातडीने हातात घेतानाच पुणे-नगर मार्ग केंद्र सरकारकडे वर्ग करण्यासंदर्भात पुढच्या वर्षी शिफारस करण्याचे आश्वासन दिले आहे. (वार्ताहर)