पुणे-नगर रस्त्याची वाहतूककोंडी सुटेना
By admin | Published: April 24, 2017 04:37 AM2017-04-24T04:37:33+5:302017-04-24T04:37:33+5:30
पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडी रोजचीच झाली असून शिक्रापूर पाबळ चौक, चाकण चौकात होणारी वाहतूककोंडी सोडवताना
शिक्रापूर : पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडी रोजचीच झाली असून शिक्रापूर पाबळ चौक, चाकण चौकात होणारी वाहतूककोंडी सोडवताना पोलीस यंत्रणेची धावपळ होत आहे. गेली अनेक वर्षे ही वाहतूककोंडी सोडवण्यास अपयश येत आहे.
शिक्रापूर, रांजणगाव, कोंढापुरी, कारेगाव, कोरेगाव, सणसवाडी, लोणीकंद, वाघोली या सुमारे ३० किमीच्या अंतरावर दिवसातून किमान १५ ते २० वेळा मोठ्या प्रमाणावर वाहतूककोंडी होत असते. अनेक भागात ट्रॅफिक सिग्नल बसवण्यात आले. परंतु ते अनेक वेळा बंद असतात, तर रस्त्याच्या कडेला नागरिकांच्या अस्ताव्यस्त उभे केलेले वाहने व रस्त्याच्या कडेला किरकोळ विक्रेते व रात्रीच्या सुमारास उभ्या राहणाऱ्या ट्रॅव्हल्सच्या गाड्या वाहतूककोंडीला कारणीभूत ठरत असून संबंधित यंत्रणेने यावर कार्यवाही करून थोडीफार वाहतूक सुरळीत होऊ शकते. मागील वर्षात काही कंपन्या व पोलीस यंत्रणा मिळून वाहतूककोंडी सोडविण्यासाठी वॉर्डनची नियुक्ती केली होती. ही यंत्रणादेखील अपुरी पडत आहे, तर राजकीय उदासीनतेत या भागाचे आमदार बाबूराव पाचर्णे, माजी आमदार अशोक पवार, विविध राजकीय पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करीत असून वाघोली ते शिक्रापूर या ठिकाणी होणारे ‘उड्डाणपूल’ केवळ कागदावरच राहिले आहे. दररोज हजारो वाहने या रस्त्यावरून जात असतात. त्यातच अनेक अपघातदेखील होत असतात. वाढते औद्योगिकरण व नागरीकणामुळे पुणे-नगर रोडवरील वाहतूककोंडी कधी सुटणार, हा गंभीर प्रश्न हजारो नागरिकांना पडला आहे. विशेष म्हणजे या रोडलगतच शिक्रापूर पोलीस ठाणे, कोरेगाव पोलीस चौकी, लोणीकंद पोलीस ठाणे, रांजणगाव पोलीस ठाणे असून येथील संबंधित अधिकारी व कर्मचारीवर्गाला दररोज होणारी डोळ््यासमोरील वाहतूककोंडी पाहण्याची वेळ येत असून, वाहतूककोंडी सोडवताना सर्वांचीच धावपळ होत आहे. (वार्ताहर)