पुणे-नाशिक : धोकादायक पद्धतीने वाहनांचे पार्र्किं ग, महामार्गालगत पार्किंगमुळे वाहतुकीस अडथळा
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 12:40 AM2019-03-20T00:40:57+5:302019-03-20T00:43:31+5:30
पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रस्त्यावर आळंदी फाटा ते कुरुळी, चिंबळी, मोई फाट्यापर्यंत अवजड वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.
कुरुळी - पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रस्त्यावर आळंदी फाटा ते कुरुळी, चिंबळी, मोई फाट्यापर्यंत अवजड वाहनचालक धोकादायक पद्धतीने वाहने उभी करीत असल्याने या रस्त्यावरून प्रवास करणारे नागरिक अक्षरश: रडकुंडीला आले आहेत.
खेड तालुक्यात गेल्या पंधरा वर्षांपासून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्षेत्रात वाढ झाल्याने पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर चाकण ते भोसरी रस्त्यावर जड मालवाहू गाड्यांची वर्दळ सतत वाढली आहे. वर्दळीच्या रस्त्यावर अवजड वाहने अवैधरीत्या भर रस्त्याच्या दुतर्फा उभी केली जात असल्याने आळंदी फाटा, कुरुळी, चिंबळी फाटा, मोई व इंद्रायणी नदीपर्यंत मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. चाकण परिसरातील आळंदी फाटा, निघोजे, कुरुळी, चिंबळी, मोई परिसरात अनेक लहान-मोठ्या कंपन्या व गोदामे उभारली आहेत. अशा कंपन्यांत कच्चा माल घेऊन येणारी अनेक वाहने रस्त्यावर उभी केली जातात. काही वाहनचालकांना तर आत कंपनीत जागा नाही असे सांगून दोन-तीन दिवस बाहेर ठेवले जाते.
अन्य राज्यातून आलेल्या वाहनचालकांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अशा वेळी त्यांची वाहने ही कंटेनर किंवा त्याहीपेक्षा मोठी अवजड असल्याने रस्त्यावर मोठी वाहतूककोंडी वाढतच आहे. त्यामुळे रस्ता मोठा असला तरी वाहतुकीस अपुरा ठरत असून त्यामुळे वाहतूककोंडी होत आहे. यावर तातडीने पोलीस प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी
केली जात आहे.'
रस्त्यावर धोकादायक पद्धतीने उभी करण्यात येणारी वाहने हटविण्यात यावीत, या रस्त्यावरून सतत जड मालवाहू गाड्यांची वर्दळ असल्याने या रस्त्याच्या दुतर्फा मालवाहू अवजड वाहने उभी केली जात असल्याने प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.
ही बेकायदा पार्किंग अवैध वाहतूक करणारे हटविण्यात गरज निर्माण झाली आहे. यावर कुठल्याही प्रकारची कारवाई केली जात नसल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थ व नागरिकांनी उपस्थित केला आहे.