पुणे-नाशिक महामार्गाने घेतला मोकळा श्वास; मंचर शहरातील अतिक्रमणे काढली
By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:56 PM2022-11-23T12:56:24+5:302022-11-23T12:56:36+5:30
अनेक व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे अगोदरच काढून टाकली होती...
मंचर (पुणे) : राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंचर शहरातील पुणे नाशिक महामार्गालगत असलेली शंभरहून अधिक अतिक्रमणे मंगळवारी काढून टाकली आहे. सकाळी सुरू झालेली ही कारवाई उशिरापर्यंत सुरू होती. अनेक व्यावसायिकांनी आपली अतिक्रमणे अगोदरच काढून टाकली होती. उर्वरित अतिक्रमणे यंत्रसामुग्री लावून काढून टाकण्यात आली. यामुळे महामार्गाने मोकळा श्वास घेतला आहे.
राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने मंचर शहरातून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गालगत असणारी अतिक्रमणे काढण्याबाबत व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या होत्या. त्या नोटिसांना प्रतिसाद देत, मंचर शहरातील व्यावसायिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली होती. काल प्रशासनाने उर्वरित अतिक्रमणे काढली. अतिक्रमणधारकांनी कोणताही विरोध न करता, अतिक्रमणे काढण्याचे काम सुरळीत झाले. शहरातून जात असलेल्या पुणे-नाशिक महामार्गालगतच्या व्यावसायिकांकडून दुकानांच्या नावाचे बोर्ड लावणे, टपऱ्या उभारणे, छोट्या-छोट्या पत्रा शेड उभारणे आदी प्रकारची अतिक्रमणे करण्यात आली होती.
काहींनी पक्के बांधकाम केले होते. या बाबींमुळे वाहतुकीस अडथळा होऊ नये, या उद्देशाने राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाने अतिक्रमण करणाऱ्या व्यावसायिकांना या अतिक्रमणे काढण्याच्या नोटिसा बजावल्या होत्या. दिलेल्या मुदतीत ही अतिक्रमणे न काढल्याने अतिक्रमण विरोधी कारवाई करण्याचा इशाराही संबंधित व्यावसायिकांना दिला. काल सकाळी राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरन, महसूल प्रशासन व पोलिस प्रशासनाच्या मदतीने अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. सुरुवातीला साळी रुग्णालयापासून अतिक्रमण काढण्यास सुरुवात झाली. तेथून पुढे पिंपळगाव फाट्यापर्यंत अतिक्रमणे काढण्यात आली. मात्र, ९० टक्के अतिक्रमणधारकांनी अतिक्रमणे आधीच काढली होती. त्यामुळे प्रशासनास कोणताही अडथळा झाला नाही.
सर्व अतिक्रमणधारकांनी प्रशासनास सहकार्य केले. व्यावसायिकांनी एकत्र येत अतिक्रमण काढण्याची भूमिका घेतली, अशी माहिती शरद बँकेचे संचालक अजय घुले, उद्योजक महेश मोरे, बाळू नाना थोरात, सतीश बेंडे पाटील, अजय काटे, सचिन तोडकर यांनी दिली. आज अतिक्रमण काढताना मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता, तसेच महामार्गावरून प्रवास करणारे अतिक्रमण कारवाई आवर्जून पाहत होते. मागील काही वर्षांपूर्वी याच परिसरातील सर्व अतिक्रमणे ग्रामपंचायतीमार्फत काढण्यात आली होती. अतिक्रमण काढल्यानंतर काही दिवसांत पुन्हा अतिक्रमणधारकांनी अतिक्रमण केले. आता या काढलेल्या अतिक्रमणाची जागा किती दिवस मोकळी राहते, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
याबाबत पोलिस निरीक्षक सतीश होडगर म्हणाले, राष्ट्रीय राज्य महामार्ग प्राधिकरण व तहसीलदार आंबेगाव यांच्या वतीने आम्हाला मिळालेल्या सूचनेनुसार, आज अतिक्रमण काढताना सुरक्षा व्यवस्था देण्यात आली होती. मी स्वत: तिथे उपस्थित होतो. आधीच अतिक्रमणधारकांनी स्वतःहून आपली अतिक्रमणे काढल्यामुळे वादविवाद न होता कार्यवाही करण्यात आली. दरम्यान, मंचर एसटी बस स्थानकाच्या संरक्षक भिंतीलगत मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले होते. ते काढण्यात आल्याने, आता एसटी बस स्थानक स्पष्टपणे दिसू लागले आहे. पुणे-नाशिक महामार्गालगत असणारी काही हॉटेल्स अतिक्रमणात काढण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, वडापावच्या टपऱ्या, चहा स्टॉल अशी अनेक अतिक्रमणे काढण्यात आली आहे. महामार्गालगत अवैधपणे लावलेले फ्लेक्स, माहितीचे फलक काढून टाकण्यात आले. प्रशासनाच्या या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केले आहे. मात्र, पुन्हा असे अतिक्रमण होऊ नये, याची काळजी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी केली आहे.
अतिक्रमणधारकांना यापूर्वीही नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर, दुसऱ्यांदा नोटीस बजावण्यात आल्याने अतिक्रमण नक्कीच काढले जाणार, याची कल्पना सर्वांना आली होती. अतिक्रमण काढताना साहित्याचे नुकसान होऊ नये, यासाठी बहुतेक व्यवसायिकांनी स्वतः पुढाकार घेऊन आपली अतिक्रमणे काढून टाकली आहेत. एकीकडे तीन जेसीबी व पाच डम्पर लावून अतिक्रमण काढून टाकले जात असताना, पुढील व्यावसायिक स्वतःहून अतिक्रमण काढून प्रशासनाला सहकार्य करत होते. शंभरहून अधिक अतिक्रमणे काढली आहेत.