कोंडीमुळे गुदमरला पुणे-नाशिक महामार्ग
By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2021 10:58 AM2021-11-30T10:58:09+5:302021-11-30T11:00:57+5:30
पुणे : विकासाचा गतीशिल महामार्ग असलेल्या पुणे - नाशिक महामार्गाचा श्वास वाहतूक कोंडीमुळे गुदमरला आहे. चुकीच्या ठिकाणी बांधलेले पूल, ...
पुणे : विकासाचा गतीशिल महामार्ग असलेल्या पुणे-नाशिक महामार्गाचा श्वास वाहतूक कोंडीमुळे गुदमरला आहे. चुकीच्या ठिकाणी बांधलेले पूल, चुकीची सिग्नल यंत्रणा तसेच पोलिसांचे वाहतूक नियोजनाचे ढिसाळ नियोजन यामुळे या मार्गाने प्रवास नकोरे बाबा, अशी म्हणण्याची वेळ प्रवाशांवर आली आहे. पुणे-नाशिक महामार्ग ते राजगुरुनगरपर्यंतच पोहोचण्यास तासंतास जात असल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या प्रश्नावर पुढाऱ्यांनी खासदारकी, आमदारकी लढवली; मात्र अद्यापही वाहतूककोंडी सुटलेली नाही, तसेच कोंडी सोडवण्याची जबाबदारी ही पोलिसांची आहे; मात्र त्यांच्याही नियोजनाचा अभाव असल्याने त्याचेही बारा वाजले आहे.
मुंबई-पुणे-नाशिक येथील औद्योगिक वसाहतींच्या मालाची वाहतूक वेगाने करण्यासाठी तसेच पुणे नाशिक अंतर कमी करण्यासाठी या मार्गासाठी गोल्डन ट्रँगल अंतर्गत विकास करण्याचे ठरले; मात्र वेगवान मालवाहतूक तर दुरच साधे प्रवासी वाहतूकही या मार्गाने वाहतूक कोंडीमुळे कासवगतीने होत आहे. मोशी, चिंबळी, चाकण, राजगुरुनगर आणि खेड घाटातून पुढे आंबेगाव तालुक्यातच जायला ३ ते ४ तास लागत आहेत. यामुळे विकासाचा मार्ग अधोगतीचा मार्ग बनला आहे.
पुणे -नाशिक महामार्गावर सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे प्रवासी व वाहनचालक हैराण आहेत. महामार्गावरील चांडोली टोलनाका ते डाक बंगलापर्यंत नेहमी वाहतूक कोंडी होत असते. महामार्गावरील अरुंद पूल, रस्त्यांची दुरवस्था, वाहनांच्या संख्येत झालेली प्रचंड वाढ व शिस्तीचा अभाव यामुळे शहरांत जलद आणि सुरक्षित प्रवास करणे कठीण झाले आहे. वाहने जिथे रस्ता मिळेल म्हणून वाकडी तिकडी चालवून तसेच वाहने पुढे दामटायची यामुळे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ताण येत आहे. यामुळे दहा मिनिटांच्या प्रवासालाही एक एक तास लागत आहे. महामार्गाच्या दुतर्फा बेकायदा वाहने पार्किंग केली जात आहेत. काही दुकानदारांनी रस्त्यावर अतिक्रमण केेले असल्याने वाहतूक कोंडीत आणखी भर पडत आहे. सलग सुट्या तसेच लग्न तिथी असल्यावर वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
वाहतूक कोंडी हॉटस्पॉट टप्पा-१
पुणे-नाशिक मार्गावरील कोंडीचा पहिला हॉटस्पाॅट म्हणजे भोसरी ते मोशी. भोसरी येथून निघाल्यावर टोलनाका आणि तेथून पुढे मोशी चौकात प्रचंड वाहतूक कोंडी होते. तसे पाहिले तर पुणे ते चाकण हे अंतर केवळ ४५ मिनिटांचे आहे; मात्र पुण्याहून निघाल्यावर मोशीपर्यंतच पोहोचायला तासभर लागतो.
वाहतूक कोंडी हॉटस्पाट टप्पा-२
मोशीच्या पुढे आळंदी फाटा, चाकण एमआयडीसी चौक, चिंबळी फाटा, कुरुळी फाटा या दरम्यान नेहमीचीच ही वाहतूक कोंडी होते. चाकण एमआयडीसी, तळवडे आयटी पार्क येथे नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने ये-जा करणाऱ्या नियमित व्यापारी व नोकरदार वर्ग या वाहनाच्या वाहतूक कोंडीने प्रचंड त्रस्त झाले आहेत.
वाहतूक कोंडी हॉटस्पाट टप्पा-३
चाकण गावच्या हद्दीत तळेगाव चौक व आंबेठाण चौकात नको त्याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. रस्त्यांच्या तुलनेत रस्त्यावर येत असलेल्या वाहनांची संख्या आता वाढली आहे. बेशिस्त वाहन चालकांची वाढती संख्या, रस्त्यालगत उभी केली जात असलेली वाहने, पोलिसांचे त्याकडे जाणुनबुजून होणारे दुर्लक्ष, अवैध प्रवासी वाहतूक, अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे, बस थांबे असून, नसल्यासारखे यामुळे वाहतूक कोंडीत अखंडपणे भर पडत आहे. त्याचा येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
वाहतूक कोंडी हॉटस्पाॅट टप्पा ४
चाकण ओलांडल्यावर राजगुरूनगर येथील अरुंद पुलामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. राजगुरूनगर शहरात ब्रिटिशांनी बांधलेला १०० वर्षापेक्षा जास्त जुना दगडी पूल असून, तो धोकादायक आहे. या पुलाबाबत ब्रिटिश गव्हर्मेंटने या पुलांचे आयुष्य संपलेचे पत्रदेखील दिले आहे. महामार्गावर भीमा नदी व बस स्थानकालगत दगडी पूल आहे. हे पूल अरूंद आहेत, त्यामुळे वाहने धिम्या गतीने वाहनचालकांना चालवावी लागतात.
वाहतूक कोंडी हॉटस्पाॅट टप्पा ५
राजगरुनगर कसे बसे ओलांडल्यावर पुढे प्रवाशांना खेड घाटातील वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. खेड बाह्यवळणाचे काम अजूनही अपूर्ण आहे. यामुळे याच मार्गाचा वापर करावा लागतो. परिणामी, वाहतुकीचा ताण वाढतो. एखादा ट्रक या घाटात बंद पडल्यास तासंतास वाहतुकीचा खोळंबा होतो.
राजगुरुनगर शहरात महामार्गावर काही वर्षांपूर्वी अतिक्रमण कारवाई करण्यात आली होती; परंतु पुढील कारवाई मात्र अद्यापपर्यंत झाली नाही. रस्त्यांचे रुंदीकरण ‘जैसे थे’ स्थितीत आहे. वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांची कमतरता आहे. वाहनचालकांची मनमानी व पुढे जाण्याच्या घाईने रस्त्यावर चक्का जाम होतो. बाह्यवळण झाल्याशिवाय शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सुटणार नाही, हे नक्की.
चुकीची कामेही कारणीभूत
चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाण पूल, वाहनचालकांचा बेजबाबदारपणा, पथदिव्यांची वानवा, महामार्गावर अनेक ठिकाणी तुटलेले प्रकाशरोधक, अवैध वाहतूक, चौकाला खेटूनच असणारे प्रवासी बस थांबे,अपुरी सिग्नल यंत्रणा, वाहतूक पोलिसांची अपुरी संख्या, चौकाला खेटून असणारे विजेचे ट्रान्सफार्मर आणि पोल अश्या एक ना अनेक कारणांमुळे चाकण शहरातील प्रमुख चौकांमध्ये सतत वाहतूक कोंडी होत आहे.
चाकणच्या उद्योगांनाही कोंडीचा फटका
पुणे-नाशिक महामार्गावरील औद्योगिक दृष्टीने सर्वात महत्त्वाच्या असणाऱ्या चाकण शहराची वाहतूक कोंडीमुळे घुसमट होत आहे. चिंबळी फाट्यापासून सुरू होणारी ही वाहतूक कोंडी चाकण शहरातील आंबेठाण चौक पार करेपर्यंत कायम राहत असल्याने वीस मिनिटाच्या अंतरासाठी दोन तासांचा कालावधी अंतर पार करण्यासाठी लागत आहे. यामुळे वेळ आणि इंधन जास्तच जात असल्याने नागरिकांना तसेच मालवाहतुकीसाठी जास्तीचा आर्थिक भूर्दंड कंपन्यांना बसत आहे. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत तळेगाव चौक व आंबेठाण चौकात नको त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत.