पुणे- नाशिक महामार्गावरील चांडोली ते तिन्हेवाडी दरम्यानची अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 13:49 IST2018-11-17T13:48:42+5:302018-11-17T13:49:22+5:30
यापूर्वी अनेकदा अतिक्रमण कारवाई करून दुकानदारांना समज देण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण केले जाते.

पुणे- नाशिक महामार्गावरील चांडोली ते तिन्हेवाडी दरम्यानची अतिक्रमणे हटविली
राजगुरुनगर: पुणे- नाशिकमहामार्गावरील चांडोली ते तिन्हेवाडी येथील रस्त्याच्या मध्यभागापासून १५ मीटर अंतरापर्यंतची अतिक्रमणे शनिवारी (दि. १७) काढण्यात आली. या कारवाईत दुकानदारांनी बसविलेले पत्रा शेड,पेव्हर ब्लॉक्स, होर्डिंग्ज, रॅम्प, जाहिरात फलक, आदी जेसीबीच्या साहाय्याने काढण्यात आले. या कारवाई दरम्यान उपविभागीय अधिकारी आयुष प्रसाद, निवासी नायब तहसीलदार राजेंद्र जाधव, मंडलाधिकारी डी. बी. उगले आदी महसूल अधिकारी उपस्थित होते. पोलीस प्रशासनाला कोणतीही पूर्वकल्पना न दिल्याने पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाई झाल्यावर घटनास्थळी हजेरी लावली. सकाळी सात वाजता सुरू झालेली कारवाई दहा वाजेपर्यंत सुरू होती.
खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या माध्यमातून शहरातील अंतर्गत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये ३ मीटर रुंदीकरण, मजबुतीकरण, फूटपाथ व गटार व्यवस्था अशी विकासकामे अंतर्भूत आहे. तसेच या कामांमध्ये बस स्थानकाशेजारील पुलाचे देखील रुंदीकरण केले जाणार आहे. या कारवाईत सार्वजनिक बांधकाम विभागाचे दिशादर्शक फलक व अनावश्यक टेलिफोन खांब काढण्यात आले. या कारवाईची दुकानदारांना कोणतीच पूर्वकल्पना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे त्यांनी नाराजी व्यक्त केली. यापूर्वी अनेकदा अतिक्रमण कारवाई करून दुकानदारांना समज देण्यात आली होती. मात्र, कारवाईनंतर लगेचच दुसऱ्या दिवशी पुन्हा अतिक्रमण केले जाते. त्यामुळे रुंदीकरणाचे काम त्वरित सुरू करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
...........................
शहरातील अंतर्गत महामार्गाच्या दुरुस्तीसाठी १२ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यामध्ये ३ मीटर रुंदीकरण, मजबुतीकरण, फूटपाथ व गटार व्यवस्था अंतर्भूत आहे. बस स्थानकाशेजारील पुलाचे देखील रुंदीकरण केले जाणार आहे. नागरिकांनी नुकतेच उद्घाटन केलेल्या हुतात्मा शिवराम हरी राजगुरु पुलाचा जास्तीत जास्त वापर करावा. बाह्यवळण कामास विलंब होत असल्याने वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करून कामादरम्यान अडथळे आणू नयेत. आमदार सुरेश गोरे