पुणे-नाशिक महामार्ग जाम
By admin | Published: March 19, 2017 03:50 AM2017-03-19T03:50:13+5:302017-03-19T03:50:13+5:30
पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर मार्केटयार्ड ते चांडोलीदरम्यान बंद पडलेल्या वाहनांमुळे सकाळी १० वाजल्यापासून जवळपास दिवसभर वाहतूककोंडी झाली
काळूस-शिरोली : पुणे-नाशिक महामार्गावर राजगुरुनगर मार्केटयार्ड ते चांडोलीदरम्यान बंद पडलेल्या वाहनांमुळे सकाळी १० वाजल्यापासून जवळपास दिवसभर वाहतूककोंडी झाली होती. लग्नसराई आणि बंद पडलेल्या वाहनांच्या मालिकेमुळे झालेल्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला.
राजगुरुनगर शहराजवळ पुणे-नाशिक महामार्गावरील वाहतूककोंडी नित्याचाच विषय बनला आहे. मात्र शनिवारी या एकामागून एक बंद पडलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीने कहरच केला. सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एसटी स्टँडसमोरील पुलावर एक कंटेनर बंद पडल्याने वाहतूककोंडी झाली. त्यानंतर मार्केट यार्डसमोरही एक कंटेनर बंद पडला.
पोलीस ठाण्याजवळील पुलावर आयशर टेम्पो राजगुरुनगर सहकारी बँकेसमोर पीएमटी व चांडोली येथेही एक १० चाकी गाडी बंद पडली. ही वाहने एकामागून एक बंद पडल्याने प्रचंड प्रमाणात वाहतूककोंडी झाली होती. त्यातच शनिवारी लग्नाची तिथी असल्याने या भागात असणाऱ्या ८ ते १० लग्नकार्यामुळे वऱ्हाडी मंडळींच्या वाढलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडीत भर पडली.
सलग बंद पडलेली वाहने पुलावरील अरुंद रस्ता, लग्नाची तारीख यामुळे वाहतूककोंडी अक्षरश: असह्य असल्याच्या प्रतिक्रिया ऐकायला मिळत होत्या. कोंडी एवढी जास्त होती, की पुण्याकडून येणाऱ्या राजगुरुनगरच्या प्रवासी, विद्यार्थी तसेच पहिल्या पाळीवरून सुटलेल्या कंपनी कामगारांनी अडीच ते तीन किलोमीटर पायी जाणेच पसंत केले. साधारण १ किलोमीटर वाहन पुढे जाण्यासाठी सुमारे पाऊण ते एक तास वेळ लागत होता.
खेडच्या दोन्ही बाजूस ८ ते १० किलोमीटरपर्यंतवाहनांच्या रांगा लागल्या होत्या. खेड पोलिसांनी वाहतूककोंडी हटवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले, तरीही सलग बंद पडत गेलेल्या वाहनांमुळे पोलिसांचे प्रयत्नही अपुरे पडत असल्याचे दिसत होते.
राजगुरुनगरजवळील कोंडी कधी फुटणार ?
राजगुरुनगरजवळील वाहतूककोंडी नित्याचीच आहे. कोंडीवर बाह्यवळण मार्ग तसेच केदारेश्वर पूल हे पर्याय आहेत, मात्र हे पर्याय उपलब्ध होण्यासाठी दीड-दोन वर्षे वाट पाहावी लागणार आहे. या भागातील लग्नकार्यालये रस्त्याकडेची अनधिकृत व्यावसायिक बांधकामे तसेच बेशिस्त वाहनचालक यांच्यामुळेही वाहतूककोंडीत भर पडत आहे. यावरही उपाय होणे गरजेचे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे आहे.