जानेवारीपर्यंत पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाला मंजुरी शक्य- राजेशकुमार जयस्वाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 19, 2018 11:23 PM2018-07-19T23:23:42+5:302018-07-19T23:23:59+5:30
राज्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेल्वेमार्गांपैकी पुणे-नाशिक रेल्वेचे काम प्राधान्यक्रमाने करण्याच्या सूचना दिल्या
पुणे : राज्यात नव्याने उभारण्यात येणाऱ्या रेल्वेमार्गांपैकी पुणे-नाशिक रेल्वेचे काम प्राधान्यक्रमाने करण्याच्या सूचना दिल्या असून, याचा सविस्तर अहवाल निती आयोगाकडे मान्यतेसाठी गेला आहे. डिसेंबर-जानेवारीपर्यंत प्रकल्प मंजूर होईल असे या प्रकल्पाचे व्यवस्थापकीय संचालक राजेशकुमार जयस्वाल यांनी मुंबईत सांगितले.
रेल्वेचे अतिरिक्त महाप्रबंधक विशाल आगरवाल, एमआरआयडीएलचे कार्यकारी संचालक राजेशकुमार जयस्वाल, रेल्वेचे मुख्यइंजिनियर (कन्स्ट्रक्शन) राजीव मिश्रा यांच्यासमवेत खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची बुधवारी बैैठक झाली.
या वेळी त्यांनी सांगितले, की राज्य व केंद्र सरकारच्या भागीदारीतून महाराष्टÑ रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट लि. कंपनी स्थापन केली असून, या कंपनीच्या माध्यमातून महाराष्टÑातील १३ नवीन रेल्वे प्रकल्पांचे काम करण्यात येणार आहे. त्यापैकी पहिल्या तीन प्राधान्याने घेण्यात येणाºया प्रकल्पांमध्ये पुणे-नाशिक रेल्वेचा समावेश आहे. कंपनी उभारणीसाठी प्राथमिक गुंतवणूक म्हणून राज्य शासनाने ४० कोटी निधी दिला आहे. तर केंद्र सरकारही ४० कोटी निधी लवकरच वर्ग करून या रेल्वेमार्गाच्या पीईसीटी (प्रिलीमनरी इंजिनिअरिंग कम ट्राफिक) सर्व्हेचे काम सुरू करण्यात येणार आहे. येत्या दोन आठवड्यांत सल्लागार कंपनीसाठी टेंडर काढण्यात येणार असून, त्यानंतर ३ महिन्यांत पीईसीटी सर्व्हे करण्यात येणार आहे.
पुणे-नाशिक रेल्वेमार्गाचा प्रकल्प अवाढव्य असून, त्यासाठी पीईसीटी सर्व्हे करून त्याचा सविस्तर प्रकल्प अहवाल केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरीसाठी सादर केला जाईल. केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर निधीची पुरेशी तरतूद अर्थसंकल्पात करण्यात येणार असल्याचे या वेळी स्पष्ट करण्यात आले.
>२०१२ च्या रेल्वे अर्थसंकल्पामध्ये तत्कालीन रेल्वेमंत्र्यांनी या रेल्वेमार्गाला तत्त्वत: मंजुरी दिली आहे; मात्र अर्थसंकल्पात प्रकल्पासाठी तरतूद केली गेली नाही. त्यानंतर सन २०१४ मध्ये रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्पात पुणे-नाशिक रेल्वेमार्गाला मंजुरी दिली.यानुसार राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वी एमआरआयडीएल कंपनीची स्थापना केली असून, मुंबईत या कंपनीचे मुख्य कार्यालय सुरू करण्यात आले आहे.