पुणे-नाशिक रेल्वेबाधितांना पाचपट मोबदला मिळणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:09 AM2021-07-01T04:09:25+5:302021-07-01T04:09:25+5:30
महापालिका क्षेत्रात अडीचपट मोबदला : चार तालुक्यांतील १२ गावांतील मोजणी पूर्ण अभिजित कोळपे लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-नाशिक ...
महापालिका क्षेत्रात अडीचपट मोबदला : चार तालुक्यांतील १२ गावांतील मोजणी पूर्ण
अभिजित कोळपे
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे-नाशिक हायस्पीड रेल्वे मार्गासाठी पुणे जिल्ह्यातील महापालिका क्षेत्र किंवा निवासी झोन असलेल्या जमिनींना अडीचपट, तर पुणे महानगर विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) क्षेत्र किंवा ना-विकास झोनमधील शेतीला पाचपट मोबदला देण्याचा निर्णय झाला आहे. हवेलीतील ६, खेडमधील ५, तर जुन्नर-आंबेगाव तालुक्यातील १ अशा एकूण १२ गावांतील मोजणीचे काम पूर्ण झाले आहे.
हवेली १२, खेड २० अधिक ३, जुन्नर-आंबेगावमधील १८ अशा चार तालुक्यांतील ५३ गावांतून रेल्वे जाणार आहे. सध्या ५३ गावांपैकी महिनाभरात १२ गावांची मोजणी झाली आहे. येत्या दोन महिन्यांत उर्वरित ४१ गावांमधील मोजणी पूर्ण करण्याचा प्रशासनाचा मनोदय आहे.
-----
आमची सर्वच जागा घ्यावी
रेल्वे प्रकल्पात जमीन जाणार असल्याने मांजरीतील मिळकतदार (एक ते अधिक गुंठा जागा विकत घेतलेले) तणावात आहेत. कारण काहींचा एक गुंठ्यापैकी अर्धा गुंठा रेल्वेत जातोय उरलेला अर्धा गुंठा घेणार नसल्याने त्याचे काय करायचे, उरलेले जागेत बांधकाम करायचे झाल्यास रेल्वे बोर्डाचे ना-हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. त्यामुळे या मिळकतधारकांनी आमची पूर्ण जागा घ्यावी, अशी प्रशासनाकडे मागणी त्यांनी केली आहे.
-----
कोट
हवेली तालुक्यातील १२ गावांचा समावेश आहे. त्यातील ६ गावांची मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित सहा गावांमध्ये शेतकऱ्यांबरोबर बैठका सुरू आहेत. त्यामुळे लवकरच या ६ गावांतील मोजणी करण्यात येणार आहे.
- रोहिणी आखाडे, भूसंपादन अधिकारी, हवेली
-----
खेड तालुक्यातील एकूण २० गावे सध्या भूसंपादनासाठी निश्चित केली आहेत. त्यात आणखी तीन गावे वाढण्याची शक्यता आहे. १८ गावांमध्ये बैठका सुरू आहेत. सध्या ५ गावांमधील मोजणी पूर्ण झाली आहे.
- विक्रांत चव्हाण, भूसंपादन अधिकारी, खेड
-----
जुन्नर आणि आंबेगाव तालुक्यातील एकूण १८ गावांमधून रेल्वे जाणार आहे. मोजणी संदर्भात आम्हाला १५ दिवस उशिराने आदेश मिळाला. सध्या मोरदरवाडी या एका गावातील मोजणी पूर्ण झाली आहे. उर्वरित गावांमध्ये बैठका सुरू आहेत.
- सारंग कोडोलकर, भूसंपादन अधिकारी, जुन्नर-आंबेगाव