पुणे, नाशिक स्वाइन फ्लूचे केंद्र
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 02:25 AM2018-09-17T02:25:45+5:302018-09-17T02:26:12+5:30
राज्यात ६३ जणांचा मृत्यू; ४० हून अधिक रुग्ण व्हेंटिलेटरवर
पुणे : राज्यात स्वाईन फ्लुने आतापर्यंत ६३ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये पुणे व नाशिक जिल्ह्यातील मृतांचा आकडा सर्वाधिक आहे. त्यामुळे राज्यात हे दोन जिल्हे स्वाईन फ्लुचे केंद्र ठरले असून तुलनेने इतर भागात हे प्रमाण खुप कमी आहे.
मागील दोन महिन्यांपासून स्वाईन फ्लुचा फैलाव वेगाने होत आहे. राज्यात सर्वत्र कमी-अधिक प्रमाण स्वाईन फ्लूचे रुग्ण आढळून येत आहेत. मात्र, पुणे व जिल्ह्याला या आजाराचा विळखा पडला आहे. सर्वाधिक रुग्ण तसेच मृत्यांची संख्या या दोन जिल्ह्यांमध्ये आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या दोन जिल्ह्यांवर अधिक लक्ष केंद्रीत केले आहे.
आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार दि. १ जानेवारीपासून दि. १४ सप्टेंबरपर्यंत नाशिक जिल्ह्यात स्वाईन फ्लुमुळे १८ तर पुणे जिल्ह्यात २१ जणांचा मृत्यू झाला आहे. पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड शहरांतील मृतांचा आकडा सर्वाधिक १५ आहे. पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने शनिवारी (दि. १५) प्रसिध्द केलेल्या अहवालानुसार आणखी सात जणांचा स्वाईन फ्लूने बळी घेतला आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्याचा एकुण मृतांचा आकडा २८ वर पोहचला आहे. तसेच राज्यातील एकूण मृतांचा आकडा ६३ वर पोहचला आहे.
राज्यात अहमदनगर, अकोला, बुलढाणा व नागपूर या जिल्ह्यांमध्ये प्रत्येकी २ तर जळगाव, कोल्हापूर, वाशिम, उस्मानाबाद, सातारा व चंद्रपुरमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मध्यप्रदेशातील एका रुग्णाचाही समावेश आहे. दि. १४ सप्टेंबर रोजी पुणे शहरातील विविध रुग्णालयांमध्ये ३१, पिंपरी-चिंचवड शहरात १० तर नागपुरमध्ये २ रुग्ण व्हेंटिलेटरवर होते. राज्यभरात १४ लाख २२ हजार ५५९ रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. तसेच १८ हजार १८४ संशयित रुग्णांना आॅसेलटॅमिवीर गोळ््या देण्यात आल्या असून ५३१ जणांना स्वाईन फ्लू झाल्याचे स्पष्ट झाले आहे.