प्रकाश जावडेकरांच्या 'त्या' विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागितली भीक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 12:16 PM2018-09-17T12:16:52+5:302018-09-17T12:31:31+5:30

राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विरोधात भीक मागो आंदोलन केले.

Pune : NCP protest against Union Minister Prakash Javadekar | प्रकाश जावडेकरांच्या 'त्या' विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागितली भीक 

प्रकाश जावडेकरांच्या 'त्या' विधानाच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मागितली भीक 

Next

पुणे : वेळ सकाळी 11 वाजता, पुण्यातील फर्ग्युसन कॉलेज रस्त्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी, नगरसेवक, कार्यकर्त्यांची गडबड सुरू झाली. अचानक त्यांनी हातात वाडगा घेतले आणि सिग्नलवर भीक मागण्यास सुरुवात केली. त्यांच्या या कृतीमुळे पोलिसांची धावपळ उडाली तर वाहनचालकांना काय सुरू आहे हेच समजेना. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या विरोधात आंदोलन केल्याचे स्पष्ट केले.

शाळांनी सरकारकडे भीक मागण्यापेक्षा माजी विद्यार्थ्यांचे साहाय्य घ्यावे, अशा आशयाचे विधान जावडेकर यांनी केले होते.टीका झाल्यावर त्यांनी आपले शब्द मागे घेत दिलगिरी व्यक्त केली आहे. याच विषयावर पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसने गोपाळ कृष्ण गोखले पथ (फर्ग्युसन कॉलेज रस्ता)येथे भीक मांगो आंदोलन केले. या आंदोलनात वाहन चालकांना थांबवून त्यांना जावडेकर यांचे वक्तव्य सांगून त्यांच्यासाठी भीक मागितली जात होती. यावेळी जमा झालेले पैसे जावडेकर यांना पाठवणार असल्याचे पक्षातर्फे सांगण्यात आले.

(शाळांनी सरकारकडे भीक मागू नये, माजी विद्यार्थ्यांकडे जावं - प्रकाश जावडेकर)

यावेळी शहराध्यक्ष चेतन तुपे म्हणाले की, शिक्षणमंत्री असूनही जावडेकर यांचे हे विधान अतिशय भयंकर आहे. या विधानाबाबत त्यांनी बिनशर्त माफी मागितली नाही तर पुण्यात फिरू देणार नाही असा इशारा त्यांनी दिला. यावेळी "जा - वडे- कर" अशी घोषणा देण्यात आली. या आंदोलनात प्रवक्ता अंकुश काकडे, महिला शहाराध्यक्षा रुपाली चाकणकर, नगरसेवक महेंद्र पठारे, भैय्यासाहेब जाधव, सुभाष जगताप, रवींद्र माळवदकर, मनाली भिलारे, अमोघ ढमाले आदी उपस्थित होते.

नेमके काय म्हणाले होते जावडेकर?

शाळांनी सरकारकडे भीकेचा कटोरा घेऊन येण्यापेक्षा शाळेच्या माजी विद्यार्थ्यांकडे आर्थिक सहाय्य मागावे, असे वादग्रस्त विधान केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केले होते. शुक्रवारी (14 सप्टेंबर) पुण्यात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात ते बोलत होते.

काही शाळा सरकारकडे आर्थिक मदत मागण्यासाठी भीकेचा कटोरा घेऊन येतात. मात्र ते  माजी विद्यार्थ्यांकडे सहज आर्थिक मदत मागू शकतात. आपल्या शाळेला किंवा महाविद्यालयाला मदत करणं हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे असे जनप्रबोधिनी शाळेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात प्रकाश जावडेकर म्हणाले होते.

Web Title: Pune : NCP protest against Union Minister Prakash Javadekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.