पुण्याला हव्यात दररोज ८०० ते हजार रक्तपिशव्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 4, 2021 04:07 AM2021-07-04T04:07:46+5:302021-07-04T04:07:46+5:30

पुणे : राज्यात वारंवार रक्ताचा तुटवडा भासतो. रक्त मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना खूप धावपळ करावी लागते. पुण्यात दर दिवशी ८०० ...

Pune needs 800 to 1000 bags of blood every day | पुण्याला हव्यात दररोज ८०० ते हजार रक्तपिशव्या

पुण्याला हव्यात दररोज ८०० ते हजार रक्तपिशव्या

Next

पुणे : राज्यात वारंवार रक्ताचा तुटवडा भासतो. रक्त मिळवण्यासाठी रुग्णांच्या नातेवाइकांना खूप धावपळ करावी लागते. पुण्यात दर दिवशी ८०० ते १००० रक्तपिशव्यांची गरज भासते. शहरात साधारण १५ रक्तपेढ्या आहेत. मात्र, दररोज केवळ ४००-५०० रक्तपिशव्यांचे संकलन होत आहे. कोरोनाची साथ काहीशी आटोक्यात आल्यामुळे सर्व रुग्णालयांमध्ये ‘नॉन कोविड’ शस्त्रक्रियांना सुरुवात झाली आहे. त्यामुळे रक्ताची मोठ्या प्रमाणात गरज भासत आहे.

राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रामध्ये दररोज साडेचार हजार ते पाच हजार रुग्णांना रक्ताची गरज भासते. गंभीर आजारांसाठी करण्यात येणाऱ्या तातडीच्या शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त, विविध आजारांचे रुग्ण, थॅलेसिमियाचे रुग्ण आणि हिमोफिलिया या रक्ताच्या आजारांच्या रुग्णांना रक्ताची गरज असते.

रक्तदान केल्यामुळे कोरोना संसर्गाचा कोणताही धोका नसतो. कोणतीही निरोगी व्यक्ती रक्तदान करू शकते. सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीत रक्ताचा तुटवडा उद्भवू शकतो. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी रक्तदान करावे, असे आवाहन रक्तपेढ्या आणि सामाजिक संस्थांकडून करण्यात येत आहे.

चौकट

‘लोकमत’च्या मोहिमेत व्हा सहभागी

“रक्तदात्यांसाठी बरेचदा धावपळ करावी लागते. दरवर्षी जून-जुलै महिन्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा निर्माण होतो. शाळा-कॉलेज बंद असल्याने, आयटी कंपन्यांचे वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने शिबिरांची संख्याही कमी झाली आहे. लसीकरणामुळे रक्ताचा पुरवठा अपुरा पडू लागला आहे. या समस्यांवर मात करण्यासाठी रक्तदानासाठी पुढे येणे आवश्यक आहे. यादृष्टीने ‘लोकमत’ने सुरू केलेली रक्तदान मोहीम कौतुकास्पद आहे. ‘लोकमत’च्या आवाहनाला प्रतिसाद देत रक्ताचे नाते ट्रस्टतर्फे ११ आणि १७ जुलै रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे ट्रस्टच्या राज्यातील पन्नास हजारांहून अधिक दात्यांनी ‘लोकमत’च्या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात येत आहे.”

- राम बांगड, रक्ताचे नाते ट्रस्ट

चौकट

आवर्जून करा रक्तदान

“रुग्णालयांशी संलग्न रक्तपेढ्या, ट्रस्ट तसेच खासगी रक्तपेढ्या सर्वत्र रक्तदानाचे प्रमाण वाढणे आवश्यक आहे. दीनानाथ हॉस्पिटलच्या रक्तपेढीमध्ये दररोज ५०-६० रक्तपिशव्यांची गरज भासते. यामध्ये प्रामुख्याने लाल रक्तपेशी, प्लेटलेट्स, प्लाझ्मा आणि क्रायोपेसिपिटेट या घटकांचा समावेश असतो. नागरिकांनी रक्तदान करून मग लसीकरण करून घ्यावे किंवा लसीकरणानंतर १४ दिवसांनी आवर्जून रक्तदान करावे. रक्तदान शिबिरेही मोठ्या प्रमाणात आयोजित होण्याची गरज आहे.”

- डॉ. संजीव केतकर, रक्त संक्रमण अधिकारी, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय

Web Title: Pune needs 800 to 1000 bags of blood every day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.