‘बंदी’ हाताचे कसब पोहोचले अमेरिकेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2018 02:49 AM2018-05-28T02:49:22+5:302018-05-28T02:49:22+5:30
मुंबईतील नव्या दमाचा तरुण उद्योगपती दिवेज मेहता याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. ती म्हणजे कैद्यांना प्रशिक्षण देऊन आपल्या परंपरागत कातडी कमावण्याच्या व्यवसायाला हातभार लावण्याची. या कल्पनेने तो भारला गेला.
- युगंधर ताजणे
पुणे - मुंबईतील नव्या दमाचा तरुण उद्योगपती दिवेज मेहता याच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना आली. ती म्हणजे कैद्यांना प्रशिक्षण देऊन आपल्या परंपरागत कातडी कमावण्याच्या व्यवसायाला हातभार लावण्याची. या कल्पनेने तो भारला गेला. त्याकरिता मुंबई-पुणे प्रवास वाढला. कल्पना प्रत्यक्षात आणण्याकरिता प्रचंड मेहनत घेतली. येरवड्यातील ५८ कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केले. त्यातून टिकाऊ, दर्जेदार, तितक्याच सुंदर बुटांची निर्मिती केली. आता या बुटांना अमेरिका, इंग्लंड विशेषत: युरोपीय खंडातील देशांकडून मोठी मागणी आहे.
मुंबईतील माटुंगा या उपनगरात राहणाºया २६ वर्षीय दिवेजने एमबीए पदवी घेतली आहे. शिक्षण झाल्यानंतर तो आपल्या कातडी
कमावणे, तसेच बूटविक्रीच्या या परंपरागत व्यवसायात शिरला. सध्या मुंबईतील बांद्रा लिंक आणि पुण्यातील एम. जी. रस्त्यावर त्याचे दुकान असून मागील वर्षी मे मध्ये त्याने येरवडा कारागृहातील कैद्यांना बूट तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यास सुरुवात केली. त्या कालावधीत त्याने जेलमधील ५८ कैद्यांकडून तब्बल दीड हजारांहून अधिक बुटांचे जोड तयार करुन घेतले.
याबद्द्ल त्याला विचारले असता तो म्हणाला की, तमिळनाडूमध्ये आमचा परंपरागत व्यवसाय आहे. मी माझ्या शिक्षणाचा उपयोग हा पारंपरिक धंदा करण्यासाठी करावा. अशी इच्छा घरच्यांची होती. मात्र मला नेहमीच पारंपरिक वाटेबरोबर
वेगळ्या दिशेने व्यवसायाचा शोध घेण्याची आवड होती. त्यानुसार मी सुरुवातील कारागृहातील कैदी, त्यांच्याकरिता राबविण्यात येणारे सामाजिक, कल्याणकारी उपक्रम यांची माहिती घेतली. अर्थात यासगळ्याचा श्रीगणेशा हा तामिळनाडूतील कारागृहापासून झाला. त्या कारागृहात माझा प्रस्ताव नाकारण्यात आला. त्यानंतर मुंबईत आल्यानंतर एका कंपनीत काम करु लागलो.
कैद्यांकरिता काम करण्याची इच्छा स्वस्थ बसू देत नव्हती.
काहीकरून आपला त्यांच्याशी संंपर्क व्हायला हवा याकरिता नवनवीन ओळखी करुन घेऊ लागलो. अखेर प्रयत्नांना यश आले. मागील वर्षीच्या फेब्रुवारी -मे दरम्यान मला तसा करार करता आला. पुढे वर्षाच्या कालावधीत उत्कृष्ट पध्दतीचे बूट बनवता आले.
एक वर्षाचा करार केलेल्या दिवेजने आता तो तीन वर्षांचा केला आहे. कैद्यांच्या अनुभवाविषयी तो सांगतो, कारागृहात खुप उत्कृष्टरीत्या काम करणारे कारागीर भेटले. त्याचे कौशल्य कौतुकास्पद म्हणावे लागेल. सर्वांनी दिलेल्या मुदतीत काम पूर्ण करुन दिल्याने कराराची मुदत वाढवली.
कैैद्यांनी तयार केलेल्या या बुटांना आता जगभरातून मागणी येत असून हे सारे श्रेय कैद्यांना द्यावे लागेल. कैद्यांंबरोबर काम करताना खुप काही शिकायला मिळाले. केवळ पैसे देणे आणि त्यांच्याकडून काम करुन घेणे हा उद्देश नसून त्यांच्यातील कारागीरपणा जिवंत राहावा यासाठी धडपड केली. त्यांच्याकरिताच्या कल्याणकारी फंडमध्ये अतिरिक्त रक्कम दिली आहे.
आता लक्ष कोल्हापुरी चपलेकडे
जे कैदी जेलमधून सुटून बाहेर आले त्यांना पुढे बुट बनविण्याच्या कारागिरीने मदतीचा मोठा हात दिला. कैद्यांच्या बाबत असे काही घडू शकते यावर विश्वास बसणे कठीण होते. हे सगळं श्रेय त्या कैद्यांचे म्हणता येईल. आपल्यातील कारागिरीचा उपयोग त्यांना जगण्यासाठी कामी आला. पुणे झाल्यानंतर आता कोल्हापुरी चप्पल बनविण्याकडे लक्ष देणार असून त्याकरिता कोल्हापूर कारागृहाशी संपर्क साधणार असल्याचे दिवेज याने सांगितले.
कारागृहातील कैद्यांकरिता नवनवीन प्रयोगशील उपक्रम राबविण्याकडे प्रशासनाचा भर असतो. पारंपरिक उद्योगाला वेगळ्या दिशेची जोड दिल्यास त्याचा उपयोग त्यांना चालू काळातील त्या व्यवसायांशी संबंधित टेÑंड शिक ण्यासाठी होतो. त्यामुळे त्यांना जेलमधून बाहेरच्या जगात गेल्यानंतर स्वत:च्या पायावर उभे राहण्याचे बळ मिळते. पुढील काळात येरवड्याच्या धर्तीवर इतर ठिकाणी देखील उपक्रम सुरु करण्यावर भर देणार आहोत.
- स्वाती साठे (कारागृह पोलीस - उपमहानिरीक्षक, पश्चिम विभाग)