Pune News:ATM उघडणाऱ्या चावीने दीड मिनिटात 11 लाख लंपास; मुळशीतील खळबळजनक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: November 27, 2024 04:00 PM2024-11-27T16:00:55+5:302024-11-27T16:11:22+5:30
एटीएममधून कॅश येत निघत नसल्याने या संदर्भात नागरिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे.
पिरंगुट : नेहमीच गजबजलेला व वर्दळीचे ठिकाण असलेल्या मुळशी तालुक्यातील लवळे फाटा येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एटीएममधून अकरा लाख रूपयांची चोरी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी बँकेचे व्यवस्थापक प्रविण चिमणदास बुटाला यांनी सोमवारी (दि.25) रोजी रात्री उशिरा या घटने बाबत पौड पोलिस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्यातील चौथा शनिवार (दि. 23)आणि रविवार (दि 24) अशा जोडून बँकेला दोन सुट्ट्या आल्यामुळे पैशांअभावी नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी शुक्रवारी (दि.२२) सायंकाळी चार वाजता अकरा लाख रुपयांची रक्कम एटीएममध्ये भरण्यात आली होती. माञ सायंकाळी सात ते साडेसातच्या दरम्यान दोन अनोळखी व्यक्तीनी एटीएम मशीनचा दरवाजा चावीने उघडून ट्रे उघडण्यासाठी लागणारा सहा अंकी पासवर्ड टाकून एटीएम च्या आत मध्ये असणारी अकरा लाख रुपयाची रक्कम पिशवीत भरून घेऊन गेले असल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.
सोमवार (दि.२५) रोजी एटीएममधून कॅश येत निघत नसल्याने या संदर्भात नागरिकांनी बँकेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता हा सर्व प्रकार उघडकीस आला आहे. तरी या घटनेबाबत बँक व्यवस्थापनाच्या वतीने पौड पोलीस स्टेशन मध्ये तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर सदर घटनेचा तपास पौडचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष गिरीगोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक योगेश जाधव हे करीत आहेत.