नॅटकॉन घेणार उद्योगांच्या भविष्याचा वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2018 03:09 AM2018-09-26T03:09:11+5:302018-09-26T03:09:29+5:30
विविध विषयांवर मंथन करण्यासाठी पुण्यात नॅटकॉन-२०१८ ही राष्ट्रीय परिषद येत्या शुक्रवारी (दि. २८) आणि शनिवारी (दि. २९) पुण्यात आयोजित करण्यात आली आहे.
पुणे : उत्पादन आणि सेवा उद्योगातील भविष्यातील गरजा, त्यासाठी करावी लागणारी तयारी, शैक्षणिक संस्थांतून उद्योगाला आवश्यक असणारे मनुष्यबळ पुरविले जाते की नाही, अशा विविध विषयांवर मंथन करण्यासाठी पुण्यात नॅटकॉन-२०१८ ही राष्ट्रीय परिषद येत्या शुक्रवारी (दि. २८) आणि शनिवारी (दि. २९) पुण्यात आयोजित करण्यात आली आहे. केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर आणि उद्योगपती डॉ. अभय फिरोदिया यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होईल.
नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ पर्सोनेल मॅनेजमेंट (एनआयपीएम), एशिया पॅसिफिक फेडरेशन आॅफ ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंटतर्फे अयोजित परिषद सकाळी साडेनऊ ते सायंकाळी ५ या वेळेत कोरेगाव पार्क येथील
एका पंचतारांकित हॉटेलमध्ये होणार आहे. नॅटकॉनचे निमंत्रक डॉ. संतोष भावे, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विश्वेश कुलकर्णी आणि पुणे चॅप्टरचे अध्यक्ष उमेश जोशी यांनी ही माहिती मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
कार्यक्रमाच्या समारोपाला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री विनोद तावडे, कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर उपस्थित असतील. एनआयपीएमचे अध्यक्ष सोमेश दासगुप्ता, श्रीकांत लोणीकर, रमेश शंकर एस, अमिताभ देव कोडवानी, डॉ. अनिल सहस्रबुद्धे, अजंथा धर्मासिरी, डेव्हिड ली ची-मिंग, लीन गोदीअर या देशी आणि आशियाई व्यवस्थापन तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार आहे.
भविष्यातील कामाची स्थिती, पुढील काळाची आखणी, शाश्वत विकासामध्ये तंत्रज्ञानाचे स्थान, शिक्षणक्षेत्रातून उद्योगक्षेत्राला पूरक मनुष्यबळ उपलब्ध करून दिले
जात आहे का?, नेतृत्वगुण जोपासणे, इतर देशांतील उद्योग आणि संस्कृती याची माहिती देणे अशा विविध विषयांवर या परिषदेत मंथन होणार आहे.