PMP E - depot : पीएमपीच्या ई-डेपोतून सीएनजी बस धावणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 14:28 IST2025-03-21T14:27:43+5:302025-03-21T14:28:06+5:30

- पीएमपीचे सध्या पुणे स्टेशन, भेकराईनगर, वाघोली, बाणेर आणि निगडी असे एकूण पाच ई-डेपो आहेत

PUNE NEWS CNG buses will run from PMP e-depot | PMP E - depot : पीएमपीच्या ई-डेपोतून सीएनजी बस धावणार

PMP E - depot : पीएमपीच्या ई-डेपोतून सीएनजी बस धावणार

पुणे :पुणे महानगर परिवहन महामंडळाने (पीएमपी) ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार भेकराईनगर ई-डेपोमधून सीएनजी बस सुरू केल्या आहेत. काही वेळा चार्जिंगची समस्या निर्माण होते. त्यावेळी सीएमजी बस सोडण्यात येणार आहे.

पीएमपीचे सध्या पुणे स्टेशन, भेकराईनगर, वाघोली, बाणेर आणि निगडी असे एकूण पाच ई-डेपो आहेत. या डेपोमधून सध्या ४९० ई-बसचे संचलन चालते. पण, काही ई-बस जुन्या झाल्या आहेत. तसेच, चार्जिंगची समस्या निर्माण झाल्यामुळे दुपारच्या टप्प्यात ई-बस फेऱ्यांना उशीर होतो तसेच, काही फेऱ्यादेखील अचानक रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते. त्यामुळे पीएमपीच्या अध्यक्ष दीपा मुधोळ-मुंडे यांनी ई-डेपोतील सेवा व्यवस्थित सुरू ठेवण्यासाठी तिथे २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट करून त्या ठिकाणाहून चालविण्याच्या सूचना दिल्या होत्या.

पीएमपीकडून पहिल्या टप्प्यात भेकराईनगर येथील ई-डेपोमध्ये २५ टक्के सीएनजी बस समाविष्ट केल्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल झालेल्या सीएनजी बसचा त्यामध्ये समावेश आहे. त्यानंतर बाणेर, निगडी डेपोमध्येदेखील लवकरच २५ टक्के सीएनजी बस दाखल होणार आहेत. त्यानंतर टप्प्या-टप्प्याने इतर ई-डेपोमध्ये सीएनजी बस सुरू केल्या जाणार आहेत. या निर्णयामुळे ई-बस बंद पडल्यास प्रवाशांना अडचण येणार नाही.

दोन नवीन ई-डेपो सुरू होणार 

पुणे महानगर परिवहन महामंडळाचे हिंजवडी फेज-२ आणि चऱ्होली हे दोन्ही इलेक्ट्रिक डेपो चार्जिंग पॉईंटसह बांधून तयार आहेत. लवकरच हे दोन्ही डेपो सुरू होणार असून, त्याचे उद्घाटनासाठी पीएमपीने तयारी सुरू केली आहे. त्यामुळे पीएमपीच्या इलेक्ट्रिक डेपोची संख्या आता सात होणार आहे.

पीएमपीच्या हिंजवडी आणि चऱ्होली या दोन्ही इ-डेपोचे काम पूर्ण झाले असून, लवकरच सुरू करण्यात येणार आहे. - सतीश गव्हाणे, मुख्य वाहतूक व्यवस्थापक, पीएमपी 

Web Title: PUNE NEWS CNG buses will run from PMP e-depot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.