पत्नीची जबाबदारी झटकून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका
By नम्रता फडणीस | Updated: March 23, 2025 14:04 IST2025-03-23T14:04:24+5:302025-03-23T14:04:49+5:30
पत्नीला दरमहा 35 हजार रुपये अंतरिम पोटगीसह खोलीचा ताबा देण्याचे आदेश

पत्नीची जबाबदारी झटकून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पतीला न्यायालयाचा दणका
पुणे : दोघांची ओळख एका संकेतस्थळावर झाली. दोघांचेही हे दुसरे लग्न. तो लग्नाच्या तीन वर्षांनंतर ऑस्ट्रेलियाला गेला; पण तिला परत घ्यायला आलाच नाही. कौटुंबिक हिंसाचारप्रकरणी न्यायालयात दाखल प्रकरणात पत्नीची जबाबदारी झटकून ऑस्ट्रेलियात राहणाऱ्या पतीला न्यायालयाने चांगलाच दणका दिला.
पत्नीला २७ डिसेंबर २०२१ पासून प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत दरमहा ३५ हजार रुपये अंतरिम पोटगी देण्याचे आदेश दिले. याखेरीज, वाकड येथे असलेल्या सदनिकेमध्ये पत्नीस एक खोली पंधरा दिवसांच्या आत राहण्यासाठी द्यावी, असे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी दिले.
राकेश आणि स्मिता (दोघांचीही नावे बदलेली) यांची ओळख लग्न जुळवून देणाऱ्या संकेतस्थळावर झाली. त्यानंतर त्यांनी ५ डिसेंबर २०१६ रोजी लग्न केले. लग्नाच्या तीन वर्षांनंतर राकेश याने ऑस्ट्रेलियाला जायचे असून त्याठिकाणी शिक्षण घेऊन नोकरी करायचे असल्याचे स्मिताला सांगितले, तसेच नोकरी लागल्यानंतर तुला घेऊन जाईन, असा विश्वासही दिला. यावेळी त्याने आई-वडील नाशिकला जाणार आहेत, तर तू सदनिकेत एकटी कशी राहशील, त्यापेक्षा तू दुसरीकडे पेइंग गेस्ट म्हणून राहण्यास जायला सांगितले. त्यानंतरही राकेश स्मिताला घेण्यास आला नाही. याउलट, त्याचे आई-वडील पुन्हा सदनिकेत राहण्यास आले. मात्र, तिचा शारीरिक व मानसिक छळ करत तिला घरात घेतले नाही.
त्यानंतर, स्मिता हिने ॲॅड. सोनाली आरू, ॲॅड. प्राची जमदाडे यामार्फत दैनंदिन खर्चाकरिता दरमहा एक लाख रुपये अंतरिम पोटगीसह वाकड येथील सदनिकेचा ताबा मिळावा यासाठी अर्ज केला. यावेळी स्मिता व राकेश या दोघांनीही मालमत्ता, उत्पन्न व खर्चाचे विवरण प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केले. राकेश हा स्थापत्य अभियंता असून त्याने ऑस्ट्रेलियात शिक्षण घेतले आहे. तेथे त्याला अडीच ते तीन लाख रुपये दरमहा उत्पन्न मिळते.
त्याचे पुण्यासह नाशिक येथे घर आहे. लग्नानंतर त्याने कधीही ऑस्ट्रेलिया येथे घेऊन गेला नाही. याखेरीज, स्मिताने दरमहा तीस हजार रुपये आपल्याला खर्च येत असून आपल्या नावावर ५० हजार रुपयांचे कर्ज असल्याचे नमूद केले. राकेश याच्या मार्फत दाखल कागदपत्रांमध्ये उत्पन्न, दायित्व व खर्चाचे विवरण नसल्याने न्यायालयाने स्मिताचे म्हणणे ऐकून घेत तिच्या बाजूने निकाल दिला.