मिळकत पत्रिकेतील पाच फेरफार आता ऑनलाईन, वेळ आणि हेलपाटेही वाचणार, भूमी अभिलेखकडून प्रणाली विकसित
By नितीन चौधरी | Updated: March 21, 2025 13:44 IST2025-03-21T13:43:18+5:302025-03-21T13:44:10+5:30
येत्या आठवडाभरात याचे अधिकृतरित्या उद्घाटन होईल.

मिळकत पत्रिकेतील पाच फेरफार आता ऑनलाईन, वेळ आणि हेलपाटेही वाचणार, भूमी अभिलेखकडून प्रणाली विकसित
पुणे : राज्यातील २१ हजार शहरांमधील सुमारे ८५ लाख कोटी मिळकत पत्रिकांमधील पाच प्रकारचे फेरफार आता संपूर्णपणे ऑनलाईन करण्यात येणार आहेत. भूमी अभिलेख विभागाने यासाठी स्वतंत्र प्रणाली तयार केली आहे. खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, हक्कसोड; तसेच गहाणखत या फेरफारसाठी ऑनलाईनच अर्ज करावे लागणार असून, अर्जावरील प्रत्येक टप्प्यावर कोणती कार्यवाही केली जात आहे, याची माहितीही अर्जदारांना एसएमएस आणि ईमेलद्वारे कळविण्यात येणार आहे. विभागाकडून हे फेरफारही ऑनलाईनच नोंदविले जाणार असल्याने नागरिकांचा वेळ आणि हेलपाटे वाचणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांची जबाबदारी निश्चित होणार आहे. येत्या आठवडाभरात याचे अधिकृतरित्या उद्घाटन होईल.
भूमी अभिलेख विभागाने ईप्सित अर्थात इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टी सिस्टीम इंटिग्रेटेड टूल ही संगणकप्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीत आता मिळकत पत्रिकेत केले जाणारे फेरफार आता ऑनलाईन केले जाणार आहेत. त्यात खरेदीखत, वारस नोंद, बक्षीसपत्र, हक्कसोड; तसेच गहाणखत या प्रमुख पाच प्रकारांचा समावेश आहे. मिळकत पत्रिकांमध्ये केल्या जाणाऱ्या एकूण फेरफारांमध्ये या पाच फेरफारांचे प्रमाण तब्बल ७४ टक्के असते. त्यामुळे या फेरफारांसाठी अर्ज ऑनलाईन करण्याचे भूमी अभिलेख विभागाने ठरविल्याचे जमाबंदी आयुक्त डॉ. सुहास दिवसे यांनी स्पष्ट केले.
यापूर्वी असा फेरफार करण्यासाठी लेखी अर्ज करावा लागत होता. त्यानंतर संबंधित कर्मचारी हा अर्ज विभागाच्या प्रणालीत केव्हा घ्यायचा हे स्वत: ठरवित होता. त्यानंतर अर्जाची तपासणी करून त्रुटी असल्यास अर्जदाराला सूचित करणे आणि फेरफार तयार करणे, यात मोठा अवधी जात होता. यासाठी ठराविक कालमर्यादा निश्चित नव्हती. यात अर्ज गहाळ होणे, त्यावर कार्यवाही न करणे अशा तक्रारींचे प्रमाण मोठे होते. तसेच गैरमार्गाचा वापरही केला जात होता. नागरिकांना यासाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागत होते. त्यात वेळही खर्ची पडत होता. आता अर्जच ऑनलाईन करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासाठी महाभूमी पोर्टलवरच स्वतंत्र टॅब उपलब्ध असेल. अर्जदाराला लॉगिन आयडी तयार करून कागदपत्र अपलोड करता येणार आहेत. त्यासाठी अर्जदाराने आपला संपूर्ण पत्ता आणि मोबाईल क्रमांक अचूक द्यायचा आहे. यावरच अर्जाची ताजी स्थिती अर्जदाराला कळविण्यात येणार आहे.
अर्ज केल्यानंतर त्यात कागदपत्रांची त्रुटी असल्यास अर्जदाराला ऑनलाईनच कळविण्यात येणार आहे. तसेच अर्जदारानेही ही त्रुटी ऑनलाईनच पूर्ण करायची आहे. संबंधित कर्मचाऱ्याने त्यानंतर त्यावर हरकती किती आल्या, सुनावणी कशी झाली, याची माहितीही ऑनलाईनच द्यायची आहे. तसेच फेरफार नोंदही ऑनलाईन करायची आहे. ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन झाल्याने नागरिकांचे कार्यालयामधील हेलपाटेही वाचणार आहेत. तसेच कर्मचाऱ्यांच्या मर्जीनुसार काम करण्याला आळा बसणार आहे. त्यासाठी परिपूर्ण अर्जावर निर्धारित २५ दिवसांत फेरफार नोंदवावा लागणार आहे.
या प्रणालीमुळे नागरिकांचे काम सोपे होणार आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते या प्रणालीचे येत्या आठवडाभरात उद्घाटन करण्यात येणार आहे.
- सुहास दिवसे, जमाबंदी आयुक्त तथा भूमी अभिलेख संचालक