पुण्यात विंटेज आणि क्लासिक कार्सचे भव्य प्रदर्शन  

By राजू इनामदार | Updated: March 28, 2025 12:03 IST2025-03-28T12:02:17+5:302025-03-28T12:03:35+5:30

१०० हून अधिक विंटेज कार्स आणि दुर्मिळ मोटारसायकलींचा समावेश

pune news Grand exhibition of vintage and classic cars in Pune | पुण्यात विंटेज आणि क्लासिक कार्सचे भव्य प्रदर्शन  

पुण्यात विंटेज आणि क्लासिक कार्सचे भव्य प्रदर्शन  

पुणे : मागील शतकातील दुर्मिळ आणि ऐतिहासिक कार्स आणि मोटारसायकलींचे अनोखे प्रदर्शन ‘विंटेज अँड क्लासिक कार/मोटर सायकल एनवल फिएस्टा २०२५’ पुण्यात मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आले आहे. हे भव्य प्रदर्शन शनिवार, २९ मार्च आणि रविवार, ३० मार्च २०२५ रोजी रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लब (RWITC), पुणे येथे पार पडणार आहे. वाहनप्रेमींसाठी हा एक ऐतिहासिक सोहळा ठरणार असून, शनिवारी सकाळी १० वाजता या प्रदर्शनाचे औपचारिक उद्घाटन होणार आहे.  



१०० हून अधिक विंटेज कार्स आणि दुर्मिळ मोटारसायकलींचा समावेश

या प्रदर्शनात १०० दुर्मिळ आणि ऐतिहासिक विंटेज व क्लासिक कार्स, तसेच १०० विंटेज स्कूटर्स आणि मोटारसायकली पाहायला मिळणार आहेत. भारताच्या समृद्ध वाहन परंपरेला उजाळा देणाऱ्या या प्रदर्शनात अनेक ऐतिहासिक आणि सेलिब्रिटींनी वापरलेल्या कार्स आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहेत.  



प्रदर्शनातील खास आकर्षणे

- भारताची सर्वात जुनी धावणारी १९०३ची "हंबर" कार – अब्बास जसदानवाला, मुंबई  
- नेताजी सुभाषचंद्र बोस आणि कुटुंबीयांनी वापरलेली डॉज किंग्सवे – सुभाष सणस  
- माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची कन्व्हर्टेबल इंपाला
- अमिताभ बच्चन यांची व्हाइट मर्सिडीज आणि विनोद खन्ना यांची सिल्व्हर मर्सिडीज
- बाळासाहेब ठाकरे यांची २००९ मर्सिडीज-बेंझ
- अल पचिनो यांची मर्सिडीज-बेंझ आणि ब्रुनेईच्या राजांची १९८१ मर्सिडीज लिमोझिन
- १९३८ ची सर्वात जुनी नॉर्टन ५०० मोटारसायकल  
- "बॉबी" फेम राजदूत मोटारसायकल

महत्वाचे आयोजक आणि पुरस्कार वितरण

या कार्यक्रमाचे आयोजन विंटेज अँड क्लासिक कार क्लब ऑफ इंडिया, वेस्टर्न इंडिया ऑटोमोबाईल असोसिएशन (WIAA), मिशेलिन इंडिया आणि एन एम टायर्स यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. पुण्याचे पहिले महापौर कै. बाबुराव सणस यांच्या स्मरणार्थ सर्वोत्कृष्ट विंटेज कारला विशेष ट्रॉफी देण्यात येणार आहे.  



 

पुणेकरांसाठी ऐतिहासिक पर्वणी

हे प्रदर्शन  नागरिकांसाठी विनामूल्य खुले  असून, वाहनप्रेमींना जुनी आणि दुर्मिळ वाहने जवळून पाहण्याची ही एक अनोखी संधी आहे. पुणेकरांनी या भव्य सोहळ्यास आवर्जून उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.  

Web Title: pune news Grand exhibition of vintage and classic cars in Pune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.