मुख्याध्यापिकेच्या चिमुकलीचा विनयभंग; रिक्षावाल्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
By नम्रता फडणीस | Updated: April 3, 2025 16:59 IST2025-04-03T16:56:42+5:302025-04-03T16:59:28+5:30
- मुख्याध्यापिका असून, त्यांची मुलगी त्यांच्याच शाळेत पहिलीमध्ये शिकते.

मुख्याध्यापिकेच्या चिमुकलीचा विनयभंग; रिक्षावाल्याला पाच वर्षे सक्तमजुरीची शिक्षा
पुणे : सात वर्षीय चिमुकलीचा शाळेत ने-आण करणार्या रिक्षावाल्यानेच विनयभंग केल्याप्रकरणी न्यायालयाने त्याला पाच वर्षे सक्तमजुरी आणि अकरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. दरम्यान, हा खटला उच्च न्यायालयाने सहा महिन्यात निकाली काढण्याचे आदेश दिले होते.
राजेंद्र महारू पाटील (वय 56) असे शिक्षा झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे. पॉक्सोचे विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी हा निकाल दिला. दंडाची रक्कम पीडितेला देण्यात यावी, ती न दिल्यास पाटील यास अतिरिक्त सहा महिन्यांचा कारावास भोगावा लागेल. याखेरीज, गुन्ह्यात जप्त केलेली रिक्षा मूळ मालकास परत करावी, असेही न्यायालयाने निकालात नमूद केले.
हा प्रकार जून 2023 दरम्यान उघडकीस आला आहे. याप्रकरणीय, सात वर्षीय पीडितेच्या आईने हडपसर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. फिर्यादी या मुख्याध्यापिका असून, त्यांची मुलगी त्यांच्याच शाळेत पहिलीमध्ये शिकते. त्या कोठेही ये-जा करण्यासाठी पाटील याची रिक्षा वापरत असत. दररोजचे ये-जा असल्याने त्यांची ओळख झाली. त्यानंतर मुलीसह स्वत:ला शाळेत ये-जा करण्यासाठी त्यांनी पाटील यांची रिक्षा ठरवली. 16 नोव्हेंबर 2023 रोजी चिमुकलीने रिक्षात बसण्यास नकार दिला. घरी आल्यानंतर तिच्याकडे विचारपूस केल्यानंतर तिने पाटील याने रिक्षामध्ये जबरदस्तीने हात पकडून् त्याच्या प्रायव्हेट पार्टला स्पर्श् करण्यास सांगितला तसेच चॉकलेटच्या आमिषाने घरी नेऊन तिचा विनयभंग केल्याचे सांगितले.
याप्रकरणी, पाटील याला अटक करत त्याविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. याप्रकरणात, विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी तीन साक्षीदार तपासले. त्यामध्ये, पीडिता, वैद्यकीय अहवाल व फिर्यादीची साक्ष महत्त्वाची ठरली. न्यायालयाने सरकार पक्षासह बचाव पक्षाचा युक्तिवाद ऐकून घेत आरोपीला शिक्षा सुनावली. हडपसर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अब्दागीरे यांनी याप्रकरणाचा तपास केला. पोलिस हवालदार संभाजी म्हांगरे यांनी कोर्ट पैरवी म्हणून कामकाज पाहिले.