डांबर खरेदीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी होणार; महापालिका आयुक्तांचे आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 13:00 IST2025-03-30T12:59:57+5:302025-03-30T13:00:36+5:30

- पुन्हा त्याच ठेकेदाराकडून डांबर खरेदी करण्याचा प्रस्ताव  

pune news Investigation to be conducted into alleged corruption in asphalt purchase; Municipal Commissioner orders | डांबर खरेदीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी होणार; महापालिका आयुक्तांचे आदेश

डांबर खरेदीतील कथित भ्रष्टाचारप्रकरणी चौकशी होणार; महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे : महापालिकेला डांबर पुरविणाऱ्या ठेकेदाराने अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संगनमताने महापालिकेची लूट केल्याचा आरोप झाल्यानंतर महापालिका आयुक्तांनी या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, पथ विभागाने त्याच ठेकेदाराकडून डांबर खरेदी करण्याचा पथ विभागाने दिलेल्या प्रस्तावही फेरविचार करण्यात येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.

महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष ॲड. नीलेश निकम यांनी महापालिकेला डांबर पुरवठा करणाऱ्या शिवम ग्रीन एनर्जी या ठेकेदार कंपनीने महापालिकेची कोट्यवधींची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. या ठेकेदाराने महापालिकेला डांबर पुरवठा केल्याची बिले दाखवून तेच डांबर पुणे, सोलापूर आणि सातारा जिल्हा सार्वजनिक बांधकाम विभागासाठीच्या कामांसाठी पाठविले आहे. एकाच मालाची दोन्हीकडे विक्री करून दोन्ही ठिकाणांहून बिले घेतल्याची अगदी टँकर क्रमांक, दिनांक आणि वेळेसह महापालिका आयुक्तांकडे पुरावा दिले. तसेच या गैरव्यवहारामध्ये महापालिकेला डांबर मिळाले नसताना त्याचे पैसे अदा केल्याचा आरोप ॲड. नीलेश निकम यांनी केला आहे. पूर्वी महापालिका थेट रिफायनरींकडून डांबर खरेदी करत होती. मात्र, मागील तीन वर्षांपासून ठेकेदाराच्या मार्फत डांबर खरेदी केले जात आहे. यामुळे महापालिकेला दहा ते बारा कोटी रुपये अधिक द्यावे लागत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.

दरम्यान, महापालिकेच्या पुन्हा तीन वर्षांसाठी डांबर पुरवठ्याची निविदा काढली असून, पुन्हा शिवम ग्रीन एनर्जी या एकाच कंपनीची निविदा आली आहे. ठेकेदाराबद्दल तक्रार केली असतानाही पथ विभागाने ही निविदा उघडली असून, फसवणूक करणाऱ्या कंपनीलाच काम देण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. महापालिका आयुक्तांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही खरेदी थांबवावी.

मागील खरेदीची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करावी. महापालिकेचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी थेट कंपन्यांकडून खरेदी करावी, अशी मागणी आयुक्तांकडे केली. आयुक्त डॉ. भोसले यांनी याप्रकरणी समिती स्थापन करून चौकशी करण्यात येईल. तोपर्यंत निविदा प्रक्रियेला स्थगिती देण्यात येईल, असे आश्वासन दिल्याचे ॲॅड. नीलेश निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Web Title: pune news Investigation to be conducted into alleged corruption in asphalt purchase; Municipal Commissioner orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.