शेताला पाणी देताना भर दुपारी शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:16 IST2025-04-06T18:16:29+5:302025-04-06T18:16:46+5:30
याबाबतची माहिती अशी की किरण दाते हे आपल्या मक्याच्या शेतात गट नं. १०३४ मध्ये दुपारी पाणी देण्यासाठी गेले होते.

शेताला पाणी देताना भर दुपारी शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला
बेल्हा : आणे (ता. जुन्नर) येथे मक्याच्या शेताला पाणी देत असताना शेतात दबा धरलेल्या बिबट्याने शुक्रवारी (दि. ४) दुपारी शेतकऱ्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात शेतकरी किरण दाते (वय ३५) हे गंभीर जखमी झाले. त्यांना पुढील उपचारासाठी मंचर येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
याबाबतची माहिती अशी की किरण दाते हे आपल्या मक्याच्या शेतात गट नं. १०३४ मध्ये दुपारी पाणी देण्यासाठी गेले होते. अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला. हल्ला झाल्यावर मोठ्या शिताफीने शेतकऱ्याने प्रतिकार करत बिबट्याला पळवून लावले. त्याच्या डोक्याला खोल जखम झाली. ही घटना आणे शिवारात नळावणे रस्त्यावर घडली.
मदतीसाठी आरडा-ओरडा केला. जवळच शेतात काम करत असलेले शेतकरी मदतीला धावले. यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून या ठिकाणी ताबडतोब पिंजरा लावण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते प्रशांत दाते यांनी जखमी किरणला उपचारासाठी मंचर येथील रुग्णालयात दाखल केले.