'हे' कार्य करण्यासाठी अल्लाहनेच तुला निवडले असेल कदाचित..! खान यांनी पाळला 'माणुसकीचा धर्म'
By राजू हिंगे | Updated: March 28, 2025 13:29 IST2025-03-28T13:28:07+5:302025-03-28T13:29:04+5:30
हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे..!

'हे' कार्य करण्यासाठी अल्लाहनेच तुला निवडले असेल कदाचित..! खान यांनी पाळला 'माणुसकीचा धर्म'
पुणे : शहराच्या मध्यवस्तीत रास्ता पेठ येथे ज्येष्ठ बहीण-भाऊ राहत हाेते. जवळचे काेणी नसल्याने हे दाेघेच एकमेकांचे आधार हाेते. अचानक भावाला देवाज्ञा झाली आणि बहीण एकटी पडली.
मदतीला काेणीच नसल्याने भावावर अंत्यसंस्कार करायचा कसा? असा यक्ष प्रश्न या ज्येष्ठ बहिणीला भेडसावत हाेता. ही बाब उम्मत सामाजिक संस्थेचे अध्यक्ष जावेद खान यांना कळाली आणि त्यांनी हातातील सर्व कामे साेडून थेट या बहिणीच्या मदतीसाठी धावले. रमजान आणि गुढीपाडव्याची लगबग सुरू असताना जावेद खान यांनी दाखविलेली माणुसकी पाहून ‘हीच अमुची प्रार्थना अन् हेच अमुचे मागणे, माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या वाक्याचा प्रत्यय आला.
रमजान महिना असताना खान यांनी केलेली ही मदत खूप काैतुकास्पद ठरत आहे. रास्ता पेठेत राहणाऱ्या एका ज्येष्ठाचे वयाच्या ७० व्या वर्षी राहत्या घरी निधन झाले. बहीण वगळता कोणीही नातेवाईक नसल्याने या ज्येष्ठाच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार कसे करायचे, असा प्रश्न बहिणीला पडला होता. याबाबत मायकल साठे यांनी जावेद खान यांना फोन करून माहिती दिली. अंत्यविधी करतोस का, अशी विचारणाही केली. त्यावर काेणताही विचार न करता जावेद खान यांनी तत्काळ होकार दिला. साठे यांच्याकडून माहिती घेऊन जावेद खान यांनी ससून रुग्णालयातील डेडहाउस गाठले. मृताची बहीण आणि पोलिस हवालदार यांची भेट घेतली. मृतदेह मिळण्यास रात्र होणार होती. तरीही रात्रीदेखील अंत्यसंस्कार करू, असे सांगून जावेद खान यांनी दु:खी बहिणीला आधार दिला.
यावर त्या बहिणीने ‘आम्ही ब्राह्मण आहोत. सूर्यास्त झाल्यावर अंत्यविधी करत नाही. आपण सकाळी अंत्यविधी करू’ असे सांगत आपल्या अश्रूंना वाट करून दिली. पण, खान यांच्यापुढेदेखील प्रश्न हाेते. कारण, दुसऱ्या दिवशी रमजानची सर्वांत मोठी रात्र होती. तरीही ‘हे कार्य करण्यासाठी अल्लाहनेच तुला निवडले असेल कदाचित’ असे त्यांच्या मनात आले आणि जात, धर्म बाजूला ठेवून सकाळी लवकर उठून वैकुंठ स्मशानभूमी गाठली.
वैकुंठ स्मशानभूमीत उपस्थित आम्ही सर्वजण सुधीर किंकळे यांचे नातेवाईक झालो. सुधीर किंकळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. ‘धर्म, जाती, प्रांत, भाषा हे द्वेष सारे संपू दे अन् पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे’ ही भावना मनी हाेती.