मनपाची नागरी सुविधा केंद्रे वाऱ्यावर;ठेकेदाराची मुदत संपल्यावर दुर्लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2025 15:44 IST2025-04-02T15:39:49+5:302025-04-02T15:44:08+5:30
काही केंद्रांचा वापर आरोग्य कोठ्यांसाठी

मनपाची नागरी सुविधा केंद्रे वाऱ्यावर;ठेकेदाराची मुदत संपल्यावर दुर्लक्ष
- हिरा सरवदे
पुणे : नागरिकांना विविध सेवा-सुविधा देण्यासाठी महापालिकेने शहरात उभारलेली नागरी सुविधा केंद्रे सध्या बेवारस स्वरूपात असून, संबंधित ठेकेदाराची मुदत संपल्यानंतर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे केंद्रांमध्ये अतिक्रमणे थाटण्यात आली असून, काही केंद्रांमध्ये महापालिकेने आरोग्य कोठी सुरू केल्या आहेत.
महापालिकेने साधारण २००६ मध्ये शहरातील विविध नागरी सुविधा केंद्रे सुरू केली होती. या प्रकल्पाच्या अटी व शर्तींवरून महापालिकेतील तत्कालीन सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोप झाले होते. या केंद्रामध्ये विविध कर भरणे, विविध अर्ज, तक्रारी आदी दाखल करता येत होत्या. त्याबरोबर पाण्याच्या टाक्या स्वच्छ करणे, नळजोडणी, ड्रेनेजसंबंधित अडचणींबाबत अर्ज, तक्रारी प्रशासनापर्यंत पोहाेचवता येत होत्या.
करारापूर्वी काम थांबवल्यास संबंधित ठेकेदाराला महापालिकेला पैसे द्यावे लागणार होते. त्यामुळे निविदेची मुदत संपेपर्यंतच ही केंद्रे चालवण्यात आली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने याकडे फारसे लक्ष दिले नाही. त्यामुळे सुविधा केंद्रांचे स्ट्रक्चर व या जागा खासगी व्यावसायिकांनी बळकावल्या आहेत. अनेक ठिकाणच्या केंद्रांच्या काही जागांवर हॉटेल व अन्य व्यवसाय सुरू आहेत, तर काही ठिकाणी राजकीय मंडळींनी आपली कार्यालये थाटली आहेत. काही केंद्रांचा वापर आरोग्य कोठींसाठी करण्यात येत आहे. या केंद्रांबाबत महापालिका प्रशासनाकडे विचारणा केल्यानंतर ही केंद्र कोणत्या खात्याच्या अंतर्गत येतात, याची माहितीच अधिकाऱ्यांना नसल्याचे समाेर आले आहे.
सध्या ६१ ठिकाणी केंद्रे
जुनी नागरी सुविधा केंद्रे बंद झाल्यानंतर महापालिकेने क्षेत्रीय कार्यालये आणि समाज मंदिर अशा ६१ ठिकाणी नव्याने नागरी सुविधा केंद्रे सुरू केली आहेत. या केंद्रांवर विविध कर, नगररचना, झोनिंग, बांधकाम परवानगी, अग्निशमन, पाणीपुरवठा, जलनिस्सारण, जकात आदींशी संबंधित दाखले आणि परवाने आशा १८ सुविधा दिल्या जात आहेत.