पुणे-सातारा महामार्गावर खासगी व्हॉल्वो बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2025 13:34 IST2025-04-17T13:33:50+5:302025-04-17T13:34:49+5:30
कोल्हापूरवरून पुण्याकडे भरधाव वेगाने येणारी बस शिंदेवाडी पुलाजवळ आली असताना इंजिन भागातून धुर निघू लागला.

पुणे-सातारा महामार्गावर खासगी व्हॉल्वो बसला आग; सर्व प्रवासी सुखरूप
पुणे - पुणे सातारा महामार्गावर वेळू तालुका भोर या गावचे हद्दीमध्ये एका खाजगी ट्रॅव्हल्स बसला दुपारी साडेबाराच्या सुमारासअचानक आग लागली. वाहन चालकाने प्रसंग अवधान दाखवून बस महामार्गावरती रस्त्याच्या कडेला घेऊन तात्काळ प्रवाशांना बाहेर काढण्यात आले त्यामुळे सुदैवाने जीवित हानी झाली नाही.मिळालेल्या माहितीनुसार कोंडुस्कर या ट्रॅव्हल्स कंपनीची वोल्वो बस कोल्हापूर कडून पुण्याच्या दिशेने जात होती. अचानक बसच्या इंजिनमधून धूर येऊ लागला आणि काही क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले. बसमधील प्रवाशांनी तातडीने बसमधून उतरून आपला जीव वाचवला.
आगीच्या घटनेची माहिती मिळताच सर्वप्रथम डब्ल्यूओएम कंपनीच्या अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, आगीची तीव्रता मोठी असल्या कारणाने आग आटोक्यात येत नव्हती त्याच बरोबर आगीमध्ये जळत असलेल्या बसमध्ये स्फोट होत असल्याकारणाने आग आटोक्यात येण्यास उशीर झाला तोपर्यंत बस खाक झाली होती.
या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी, प्रवाशांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांच्या सामानासह बसमधील सर्व वस्तू जळून गेल्या आहेत. आगीच्या कारणांचा अद्याप पत्ता लागलेला नाही. मात्र, प्राथमिक अंदाजानुसार शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असा कयास वर्तवला जात आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
या घटनेमुळे महामार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती,या घटनेनंतर पुन्हा एकदा खेडशिवापूर परिसरामध्ये अग्निशमन दलाचे केंद्र असावं या मागणीला जोर येऊ लागला आहे गेले अनेक वर्षांमध्ये या भागामध्ये अनेक मोठ्या आग लागण्याच्या घटना घडल्या असल्याने अग्निशमन दलाचे या भागामध्ये केंद्र सुरू करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.