लाठ्या-काठ्या खाऊ, गोळ्या झेलू; परंतु विमानतळ होऊ देणार नाही; ग्रास्थांचा निर्धार
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2025 09:32 IST2025-03-26T09:31:50+5:302025-03-26T09:32:44+5:30
- वनपुरी ग्रास्थांचा निर्धार : विश्वासात न घेता आमची भूमिका समजून न घेता प्रकल्प लादला जात असल्याचा आरोप

लाठ्या-काठ्या खाऊ, गोळ्या झेलू; परंतु विमानतळ होऊ देणार नाही; ग्रास्थांचा निर्धार
सासवड : महाराष्ट्र शासनाने स्थानिक प्रकल्पबाधित नागरिकांना कोणत्याही प्रकारे विश्वासात न घेता प्रकल्पबाधितांची भूमिका समजून न घेता सदर प्रकल्प शासन लादत असून, तो आमच्यावर अन्यायकारक आहे. गावात विमानतळ प्रकल्प करण्याचा कितीही निर्धार केला आणि कितीही प्रयत्न केले तरी कोणत्याही परिस्थितीत शांततेच्या मार्गाने त्यास विरोध केला जाईल. वेळ पडल्यास लाठ्या, काठ्या खाऊ पोलिसांच्या गोळ्या झेलू, परंतु विमानतळ प्रकल्प होवू देणार नाही. एमआयडीसीच्या माध्यमातून शासन दररोज एक एक घोषणा करीत आहे. कोणत्याही परिस्थितीत प्रकल्प हद्दपार करणारच असा ठाम निर्धार वनपुरी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.
पुरंदर तालुक्यातील वनपुरी, उदाचीवाडी, पारगाव, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी या सात गावांत विमानतळ प्रकल्प जाहीर केला असून, यासाठी २,८३२ हेक्टर क्षेत्र संपादित करण्याचे जाहीर केले आहे. मात्र यामुळे सातही गावे कायमची विस्थापित होण्याचा धोका व्यक्त करीत सातही गावातील नागरिकांनी सुरुवातीपासून कडवा विरोध केला आहे. मात्र शासनाकडून शेतकऱ्यांचा विरोध झुगारून दररोज नवनवीन घोषणा केल्या जात आहेत. त्यामुळे या भागातील नागरिक पुन्हा एकदा आक्रमक झाले असून, प्रकल्प हद्दपार होण्यासाठी कोणत्याही पद्धतीचा वापर करू मात्र प्रकल्प होवू देणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
मोठी बातमी: दुधात भेसळ करणाऱ्यांवर थेट मकोका लागणार; बैठकीत अजित पवारांच्या कठोर सूचना
वनपुरी येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथ मंदिरात एका बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी प्रकल्पाला विरोध करताना माजी सरपंच नामदेव कुंभारकर यांनी शासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध केला. ग्रामस्थांनी राजकीय गट, तट, एकमेकांतील मतभेद बाजूला ठेवून एक होण्याचे त्यांनी आवाहन केले. आपण आता भांडत बसलो आणि शासनाच्या भूमिकेला पाठिंबा दिला तर भविष्यात आपण एकमेकांत राहणार नाही. कायमचे विस्थापित व्हावे लागेल. त्यामुळे वेगवेगळ्या माध्यमातून आपला लढा सुरु ठेवायचा, असे आवाहन त्यांनी ग्रामस्थांना केले आहे.
यावेळी पुरंदर शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक मच्छिंद्र कुंभारकर, माजी सरपंच नामदेव कुंभारकर, महादेव कुंभारकर, ज्ञानदेव कुंभारकर, सतीश कुंभारकर, हनुमंत कुंभारकर, संतोष हगवणे, सोमनाथ कुंभारकर, विकास कुंभारकर, सयाजी कुंभारकर, दिलीप कुंभारकर, अंकुश कुंभारकर, लंकेश महामुनी, बाळासाहेब हगवणे, महेश मगर, शांताराम कुंभारकर, युवा कार्यकर्ते राजेंद्र कुंभारकर, सुनील कुंभारकर, सखाराम कुंभारकर, सुनील गायकवाड, संजय कुंभारकर, अशोक कुंभारकर यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आमच्या जमिनीवर शासन परस्पर प्रकल्प उभारत असेल आणि आम्हाला कायमचे विस्थापित व्हावे लागत असेल तर असे प्रकल्प आम्हाला नको आहेत. आमच्या जमिनी काढून घेतल्यावर कोठे जायचे आणि कसे राहायचे? अनेक संघटना नाव बदलासंदर्भात मागण्या करत आहेत. मुळातच विमानतळाचे छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळ, असे नामकरण विमानतळाचे घोषणेवेळीच झालेले आहे. तालुक्यातील यापूर्वी अनेक गावांनी विमानतळ व्हावा म्हणून ठराव दिले होते. त्यांनी त्यांचे गावात विमानतळ करावा .. - संतोष हगवणे, बाधित प्रकल्पग्रस्त