वन्यप्राणी उपचार केंद्रात पक्ष्यांसाठीचे पुनर्वसन केंद्र; जावडेकर दाम्पत्याकडून मदतीचा हात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2025 10:24 IST2025-03-28T10:23:51+5:302025-03-28T10:24:31+5:30

- पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांची माहिती : शहरातील जावडेकर दांपत्याने मदतीचा हात केला पुढे

pune news Rehabilitation center for birds at the wildlife treatment center | वन्यप्राणी उपचार केंद्रात पक्ष्यांसाठीचे पुनर्वसन केंद्र; जावडेकर दाम्पत्याकडून मदतीचा हात

वन्यप्राणी उपचार केंद्रात पक्ष्यांसाठीचे पुनर्वसन केंद्र; जावडेकर दाम्पत्याकडून मदतीचा हात

पुणे : एनडीए रस्त्यावरील पुणे वन विभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात पक्ष्यांसाठी व विशेषकरून मोठ्या आकाराच्या पक्ष्यांसाठी एक विशेष नवीन एनक्लोजर (पक्ष्यांसाठीचे पुनर्वसन केंद्र) उभारण्यात येणार असल्याची माहिती पुणे विभागाचे उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांनी दिली आहे. या केंद्राच्या उभारणीसाठी पुणे येथील श्रुती व सर्वेश जावडेकर या दाम्पत्याने मदतीचा हात पुढे केला असून, या विशेष एनक्लोजरच्या उभारणीसाठी त्यांनी रुपये ५० लाखांची देणगी सदर वन्यप्राणी उपचार केंद्राचे व्यवस्थापन पाहणाऱ्या रेसक्यू चॅरीटेबल ट्रस्टला दिली आहे, असेही त्यांनी सांगितले.

नेहा पंचमिया म्हणाल्या, वर्ष २०२४ मध्ये पुण्यातील या वन्यप्राणी उपचार केंद्र येथे सुमारे ७ हजार ५०० प्राण्यांवर उपचार करून त्यांना पुन्हा त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. त्यापैकी जवळपास ४ हजार ४०० ही पक्ष्यांची संख्या होती. वेगाने सुरू अससेल्या नागरीकरण, बदलत्या हवामानामुळे उपचारासाठी येणाऱ्या जखमी पक्ष्यांची संख्या वाढणार आहे,

असा अंदाज आहे. त्यामुळे पक्ष्यांसाठीचे हे विशेष एनक्लोजर आमच्या या वन्यजीव उपचार केंद्राची क्षमता वाढवण्यासाठी महत्त्वाचे ठरेल आहे. येथे नवजात पक्ष्यांसाठी उपयुक्त २ एव्हीयन नर्सरी देखील निर्माण केल्या जातील. उपचारानंतर पक्ष्यांना अधिवासात सोडण्याआधी त्यांची उडण्याची क्षमता तपासण्यासाठी फ्लाइट टेस्टिंग एरीयाही या एनक्लोजरच्या रचनेतील एक महत्त्वाचा भाग असेल.

६० टक्क्यांहून अधिक प्रजाती दुर्मीळ

पक्ष्यांसाठीच्या या विशेष एनक्लोजरमध्ये ३२ युनिट्सची सोय असेल. पक्ष्यांच्या प्रकारानुसार एका वेळी १५० ते २०० पक्ष्यांना सामावून घेण्याची या नवीन एनक्लोजरची क्षमता असेल. सध्या या वन्यप्राणी उपचार केंद्राची क्षमता ही एकावेळी साधरणतः १०० पक्ष्यांसाठीची आहे. या नवीन एनक्लोजरमुळे ही क्षमता उपचारासाठी ३०० पक्षी एका वेळी सांभाळण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असे पंचमिया यांनी सांगितले. सर्वेश जावडेकर म्हणाले, एका अंदाजानुसार भारतात सापडणाऱ्या एकूण पक्ष्यांच्या प्रजातींपैकी सुमारे ६० टक्क्यांहून अधिक प्रजाती या दुर्मीळ होण्याच्या मार्गावर आहेत. निसर्गाच्या परिसंस्थेत पक्ष्यांना मोठे स्थान आहे. त्यामुळे पुणे वन विभागाच्या वन्यप्राणी उपचार केंद्रात उभारल्या जाणाऱ्या एनक्लोजरच्या निर्मितीला हातभार लावावे, असे आम्हाला वाटले आणि त्यादृष्टीने आम्ही रेसक्यू चॅरीटेबल ट्रस्टला आर्थिक मदत करत आहोत.

येत्या ६ ते ८ महिन्यांत होणार पूर्ण

या एनक्लोजरमध्ये नवजात पक्ष्यांसाठी उपयुक्त अशा २ एव्हीयन नर्सरी देखील निर्माण केल्या जातील. तसेच, उपचारानंतर पक्ष्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात सोडण्याआधी त्यांची उडण्याची क्षमता तपासून पाहण्यासाठी गरजेचा असलेल्या फ्लाइट टेस्टिंग एरीया देखील या एनक्लोजरच्या रचनेतील एक महत्त्वाचा भाग असेल. एनक्लोजरच्या उभारणीचे काम येत्या ६ ते ८ महिन्यांत पूर्ण करण्यावर भर असेल, अशी माहिती जावडेकर यांनी दिली. सर्वेश जावडेकर हे बांधकाम व्यवसायाशी संबंधित असून, श्रुती या वास्तुविशारद आहेत.

Web Title: pune news Rehabilitation center for birds at the wildlife treatment center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.