पुणेकरांनी उभारली महागड्या घरांची गुढी; सरकारच्या तिजोरीमध्ये १ हजार १६७ कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2025 14:03 IST2025-03-30T13:56:05+5:302025-03-30T14:03:45+5:30
गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर महागड्या घरांची खरेदी महसूल वाढला; दस्त संख्या मात्र घटली

पुणेकरांनी उभारली महागड्या घरांची गुढी; सरकारच्या तिजोरीमध्ये १ हजार १६७ कोटी
पुणे : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर शहरात नवीन घरांच्या खरेदीत उत्साह दिसून येत आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा चांगली असलेली आर्थिक स्थिती, स्थिर व्याजदर, १ एप्रिलपासून रेडीरेकनरच्या दरांत होऊ घातलेली दरवाढ या पार्श्वभूमीवर शहरात १ ते २७ मार्चपर्यंत २२ हजार १३० दस्त नोंदणी झाली. त्यातून राज्य सरकारच्या तिजोरीत विक्रमी १ हजार १६७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
गेल्या काही महिन्यांच्या तुलनेत दस्तसंख्या कमी असली तरी जमा झालेला महसूल सर्वाधिक असल्याने उच्च किमतीच्या घरांना नागरिक पसंती देत असल्याचे चित्र आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदाच्या मार्च महिन्यात दस्त संख्या अधिकची असण्याची शक्यता पुणे शहर जिल्हा सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी व्यक्त केली आहे.
गेल्या दोन वर्षांपासून रेडीरेकनर दरांत वाढ झालेली नाही. त्यामुळे यंदा किमान ५ ते १० टक्के वाढ होणार असल्याचे अधिकाऱ्यांचे निरीक्षण आहे. त्या पार्श्वभूमीवर शहरात नवीन घरांच्या खरेदीकडे कल वाढल्याचे दिसून येत आहे. रेडीरेकनर दरांत वाढ होईल या शंकेमुळे शहरात दस्तनोंदणी ३१ मार्चपूर्वीच करण्याकडे अनेक ग्राहक व व्यावसायिकांचा कल दिसून आल्याची माहिती मुद्रांक शुल्क विभागाचे सहनिबंधक संतोष हिंगाणे यांनी दिली.
८ हजार ८३७ कोटींचा महसूल जमा
यंदा शहरात १ ते २७ मार्चपर्यंत या काळात २२ हजार १३० दस्तांची नोंदणी झाली आहे. त्याततून राज्य सरकारला १ हजार १६७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. तर १ एप्रिल २०२४ पासून २८ फेब्रुवारी २०२५ पर्यंत २ लाख ५२ हजार २१ दस्तांची नोंद झाली होती. यातून एकूण ८ हजार ८३७ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे.
महसूल १० हजार ४०० कोटींपर्यंत जाणार
मार्चच्या शेवटच्या चार दिवसांत आणखी किमान ५ हजार दस्त नोंदले जातील, अशी शक्यता वर्तवून हिंगाणे यांनी मार्चचा एकूण महसुलात ३०० कोटींनी वाढ होऊन तो १४५० कोटी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. गेल्या वर्षी अर्थात २०२३-२४ या आर्थिक वर्षात शहरात एकूण दस्त नोंदणी २ लाख ९२ हजार १६१ इतकी झाली होती. त्यातून ९ हजार ३४४ कोटी रुपयांचा महसूल मिळाला होता. यंदा हाच महसूल १० हजार ४०० कोटींपर्यंत जाईल, अशी अपेक्षा हिंगाणे यांनी व्यक्त केली आहे.
उच्च किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ
मार्च महिन्याचा विचार करता दस्तांची संख्या कमी झाली आहे. मात्र, मिळालेला महसूल विक्रमी असल्याचे हिंगाणे यांनी स्पष्ट केले. याचाच अर्थ शहरात उच्च किमतीच्या घरांच्या विक्रीत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. या गृहितकाला क्रेडाईचे अध्यक्ष रणजित नाईकनवरे यांनीही दुजोरा दिला आहे. शहरात आता सामान्य नागरिकही २ बीएचके घरांच्या खरेदीला पसंती देत आहे. त्यामुळेच नोंदणी व मुद्रांक शुल्कातही वाढ दिसून येत आहे, असेही नाईकनवरे यांनी सांगितले.