पुण्यातील खळबळजनक घटना! आचारीकडून धक्कादायक प्रकार उघडकीस, डबे पोहोचण्याबरोबरच केल्या घरफोड्या
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2021 11:27 AM2021-06-08T11:27:51+5:302021-06-08T11:41:30+5:30
पोलिसांच्या कसून चौकशीत आचार्याकडून १३ घरफोडी, वाहनचोरी, जबरी चोरीचे १५ गुन्हे उघड
पुणे: खानावळीत आचारी म्हणून काम करत असतानाच तो डबे पोहचवण्याचे काम करत होता. या कामाच्या आडून तो बंद घरांची रेकी करुन त्याची माहिती आपल्या साथीदारांना देत असे. त्यानंतर ते घरफोडी करत होते. अशा आचार्याला गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाला अटक केली आहे.
आकाश अशोक उमाप (रा. वानवडी) असे त्याचे नाव आहे. उमाप याच्याकडून शहरातील १३ घरफोडी, १ वाहनचोरी, १ जबरी चोरी असे एकूण १५ गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून ७७ ग्रॅम सोन्याचे दागिने, एक किलो चांदीच्या वस्तू व दागिने, दोन दुचाकी, १ टीव्ही व ४६ हजार रुपये असा एकूण ६ लाख ७० हजार रुपयांचा ऐवज हस्तगत केला आहे.
पोलीस अंमलदार नितीन मुंढे यांना हडपसर येथील जबरी चोरीचा गुन्हा एका आचार्याने केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी वानवडीतील विकासनगर भागात सापळा रचून आकाश उमाप याला पकडले. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर त्याने "मी स्वत: आचारी असून लोकांना डबे पुरविण्याचे काम देखील करतो. तुम्हाला माझ्याबाबत मिळालेली माहिती चुकीची आहे." असे सांगून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केल्यावर त्याने कबुली दिली.
उमाप हा वानवडी परिसरातील एका मेसमध्ये जेवण बनविण्याचे व डबे पोहोचविण्याचे काम करत आहे. कामाच्या आडून पुण्यातील विविध परिसरात बंद घरांची रेकी तो करत असत. आपल्याला साथीदारांना त्याची माहिती देत असत. सराईत गुन्हेगार जयसिंग कालुसिंग जुन्नी ऊर्फ पिलु, सोमनाथ ऊर्फ सोम्या गारुळे (दोघे रा. बिराजदारनगर, हडपसर) यांच्या सोबत त्याने घरफोडी, जबरी चोरी, वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे सांगितले.