कृषीमंत्री कोकाटेंना उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर मंत्रिपद वाटू लागले औटघटकेचे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2025 09:41 IST2025-04-10T09:39:29+5:302025-04-10T09:41:54+5:30

आम्ही आज मंत्री, तर उद्या सामान्य नागरिकच; कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी बोलून दाखविली मनातील खदखद

pune news Statement by Agriculture Minister Manikrao Kokate regarding the ministerial post being taken out of the party | कृषीमंत्री कोकाटेंना उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर मंत्रिपद वाटू लागले औटघटकेचे

कृषीमंत्री कोकाटेंना उपमुख्यमंत्र्यांनी समज दिल्यानंतर मंत्रिपद वाटू लागले औटघटकेचे

पुणे : कृषिमंत्रिपदाचा कार्यभार सांभाळणारे आणि सतत वादग्रस्त विधानांमुळे चर्चेत राहणारे माणिकराव कोकाटे यांना उपमुख्यमंत्री यांनी समज दिल्यानंतर आता त्यांना मंत्रिपद औटघटकेचे वाटू लागले आहे. मला मंत्रिपदाचे काही वाटत नाही, अशी निरवानिरवीची भाषा कोकाटे यांनी बोलून दाखविली आहे. चार-दोन गोष्टी चुकू शकतात, मी पण सामान्य माणूसच आहे, अशी उपरती कोकाटे यांना आली आहे. यामागे आपला हेतू स्वच्छ होता, अशी सारवासारवही केली आहे. यावरून कोकाटे मंत्रिपदाच्या जबाबदारीतून मुक्त होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत का, असा प्रश्न आता विचारला जात आहे.

पुण्यात बुधवारी (दि. ९) कृषी विभागातर्फे आयोजित अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या राज्यस्तरीय कार्यशाळेत ते बोलत होते. त्यापूर्वी कृषिराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांनी मंत्री काही काळासाठी असतो, मंत्री म्हणून पक्षाने दिलेली जबाबदारी कायमस्वरूपी नसते, त्यामुळे आम्ही आज मंत्री, तर उद्या सामान्य नागरिक असतो, या वक्तव्यावर कोकाटे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली. शेतकरी अनेक वर्षे कर्जाची परतफेड करत नाहीत आणि कर्जमाफीची वाट बघतात. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्यास त्यातून ते साखरपुडे आणि लग्न करतात, असे वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर कोकाटे चांगलेच अडचणीत आले. त्यावर विरोधी पक्षांनी चांगलीच आगपाखड केली.

 मंत्रिमंडळातील सहकारी पक्षाचा मंत्री या नात्याने महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शेतकऱ्यांची माफीही मागितली. उपमुख्यमंत्री यांनीही पुण्यात पत्रकारांशी बोलताना सार्वजनिक जीवनात कार्यरत असताना तोलूनमापून बोलावे असा सल्लाही दिला. त्यानंतर पवार यांनी कोकाटे यांना प्रत्यक्ष बोलावून चांगलीच समज दिल्याची चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर कोकाटे यांना ही उपरती झाली आहे.

आपण काय काम करतो, आपल्याला काय जबाबदारी दिली आहे, हे जास्त महत्त्वाचे असल्याचे सांगून मंत्रिपद औटघटकेचे आहे. मंत्रिपदाचे आपल्याला काही वाटत नाही. मंत्रिपदाबाबत मला फार अपेक्षित नव्हते. आपल्याला काही वेगळे मिळवायचे आहे, असे काही नव्हते, जी जबाबदारी पक्षाने, नेत्याने व समाजाने दिली ती कर्तव्यभावनेने पार पाडायची आहे, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी यावेळी दिली.

Web Title: pune news Statement by Agriculture Minister Manikrao Kokate regarding the ministerial post being taken out of the party

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.