उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 13:32 IST2025-03-25T13:29:21+5:302025-03-25T13:32:42+5:30

- फेब्रुवारीत ३८,५३२ टँकरने पाणीपुरवठा, मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाणीटंचाईचा फटका

pune news the heat of the summer has increased due to water shortage Pune residents are quenching their thirst with tankers | उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर

उन्हाचा वाढला चटका, पाण्याची टंचाई असल्याने पुणेकरांची तहान भागतेय टँकरवर

पुणे - उन्हाच्या वाढच्या चटक्यामुळे शहराच्या मध्यवर्ती भागासह उपनगरांमध्ये पाण्याची मागणी वाढत आहे. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार चालू आर्थिक वर्षात आतापर्यंत ४ लाख ४ हजार ३४० तर फेब्रुवारी महिन्यात ३८ हजार ५३२ टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात आला आहे. उन्हाळा आता कुठे सुरू झाला आहे आणि हजारो टँकरने पुणेकरांना पाणीपुरवठा करावा लागत आहे. त्यामुळे पुढील दोन महिने आणखी टंचाई भासणार असल्याने पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

शहरासाठी खडकवासला धरणसाखळी आणि भामा आसखेड प्रकल्पातून पाणी आणून ते महापालिकेच्या विविध जलशुद्धीकरण केंद्रात प्रक्रिया करून ते नळाद्वारे नागरिकांना वितरित केले जाते. जेथे पाणीपुरवठा होत नाही किंवा काही कारणाने पाणी पोहोचू शकलेले नाही, अशा ठिकाणी महापालिकेतर्फे मोफत टँकर दिले जातात. महापालिकेकडे टँकरची संख्या कमी असल्याने ठेकेदारांच्याही टँकरद्वारे पाणी पुरवठा केला जातो. किमान आठ टँकर असलेल्या ठेकेदारांमार्फत अन्य ठिकाणी पाणी पोहोचवले जाते. यासाठी पालिका ठेकेदारांना शुल्क देते. तर ज्या सोसायट्यांना पाणी कमी पडते किंवा त्यांना अतिरिक्त पाण्याची गरज आहे, अशा सोसायट्या निश्चित शुल्क (चलन) भरून टँकर विकत घेतात. या तिन्ही प्रकारच्या टँकरची नोंद पालिकेच्या पाणीपुरवठा विभागातर्फे ठेवली जाते. यासाठी महापालिकेला वार्षिक सुमारे ४० कोटी रुपयांहून अधिक खर्च येतो.

याशिवाय खासगी टँकरचालक आपला पाणीसाठा वापरून पाणीपुरवठा करतात. त्यांच्यावर पालिकेचे कोणतेही नियंत्रण नाही. तसेच त्यांची नोंदही पालिकेकडून ठेवली जात नाही. त्यामुळे खासगी टँकरच्या शुल्कावर महापालिकेचे नियंत्रण नाही. त्यामुळे टँकरचालकांकडून मनमानी पद्धतेने शुल्क आकारून नागरिकांची लूट केली जाते.

यंदा टँकर चार हजारांनी वाढले !

मागील वर्षभरात एकूण ४ लाख ४ हजार ३४० टँकर फेऱ्यांद्वारे पाणी पुरविले गेले होते. यात कंत्राटदारांच्या ३ लाख ५९ हजार ४५८ टँकरचा समावेश आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे प्रमाण जवळपास ४ हजारांनी वाढले आहे. यंदा उन्हाचा चटका जानेवारीपासूनच जाणवू लागला आहे. आता त्याची तीव्रता वाढली आहे. त्यामुळे पाण्याचीही मागणी वाढत आहे. महापालिकेने जानेवारीमध्ये ३९ हजार ६९२ टँकरफेऱ्यांद्वारे पाणीपुरवठा केला आहे. तर फेब्रुवारीमध्ये ३८ हजार ५३२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला आहे.

टँकर आकडेवारी

- सन २०२२- २३ (३,५४,२५४ - टँकर)

जानेवारी २८,५८०

फेब्रुवारी २७,२८०

- सन २०२३- २०२४ (४,००,३४८ - टँंकर)

जानेवारी ३२,५८०

फेब्रुवारी ३३,९५१

- सन २०२४- २०२५ (फेब्रुवारी अखेर - ४,४०,३४०)

जानेवारी ३९,६९२

फेब्रुवारी ३८,५२२ 

Web Title: pune news the heat of the summer has increased due to water shortage Pune residents are quenching their thirst with tankers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.