प्रसूतीदरम्यान संभाव्य जोखीम नको, म्हणून सिझेरियनला देतात प्राधान्य ! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2025 13:18 IST2025-03-23T13:17:30+5:302025-03-23T13:18:10+5:30

- नाॅर्मल प्रसूती कमी हाेत असून, सिझेरियनचे प्रमाण वाढले आहे.

PUNE NEWS : They prefer cesarean section because they don't want any potential risks during delivery! | प्रसूतीदरम्यान संभाव्य जोखीम नको, म्हणून सिझेरियनला देतात प्राधान्य ! 

प्रसूतीदरम्यान संभाव्य जोखीम नको, म्हणून सिझेरियनला देतात प्राधान्य ! 

- अंबादास गवंडी
 
पुणे : शिक्षण, नोकरी व इतर कारणांमुळे मुलींच्या लग्नाला उशीर हाेत आहे. त्यानंतर गर्भधारणेला लागणारा वेळ आणि प्रसूतीदरम्यान निर्माण होणारी संभाव्य जोखीम नकाे म्हणून अनेक महिला नार्मल प्रसूतीपेक्षा सिझेरियनला प्राधान्य देत आहेत. डाॅक्टरही कुठलीच रिस्क नकाे म्हणून याच मार्गाचा अवलंब करत आहेत. त्यामुळे नाॅर्मल प्रसूती कमी हाेत असून, सिझेरियनचे प्रमाण वाढले आहे. हेच पुणे शहरातील गेल्या तीन वर्षांतील आकडेवारीवरून स्पष्ट हाेत आहे.

दहा ते वीस वर्षांपूर्वी मुलीचे लग्न लवकर होत होते. त्यामुळे पहिले बाळ साधारणपणे २० ते २१ व्या वर्षी जन्माला येत होते. आता साधारणतः २६ ते ३० या वयात मुलींचे लग्न होत आहे. त्यामुळे जन्माला येणारे बाळ ३३ ते ३४ व्या वर्षी जन्माला येत आहे. वय वाढल्याने अनेक जोखीम निर्माण होतात. शिवाय बाळ जन्माला येणे ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी काही नैसर्गिक कारणाने, तर काही अपरिहार्य कारणाने आई आणि बाळाला वाचवण्यासाठी काही वेळा सिझेरियन केले जाते.

ही असू शकतात कारणे?

नैसर्गिक काही कारण जसे महिलेचे माकडहाड लहान असेल आणि मोठ्या वजनाचे बाळ बाहेर येण्यास अडचणी येत असतील, बाळाला काही आनुवंशिक आजार असेल, ते जगण्याची शक्यता कमी असते, म्हणून सिझेरियन करतात. याचबरोबर गुंतागुंतीची प्रसूती, पूर्वी सिझर झालेले असेल, बाळ गुदमरत असेल, अपघातात इजा झाली असेल, मातेची उंची आणि वजन कमी असेल, कमी दिवसाची प्रसूती असेल किंवा मातेला गर्भाशयाचे आजार असतील तर अशा परिस्थितीत सिझेरियनचा मार्ग अवलंबला जातो.

तपासणीमुळे बालकाचे वजन वाढले 

गर्भधाणेनंतर वेळोवेळी तपासण्या केल्याने, तसेच बाळाची योग्य काळजी घेतल्याने नवजात बालकांचे वजन तुलनेने वाढले आहे. पूर्वी सिझेरियनची प्रक्रिया खूप क्लेशदायक होती, आता सोपी आणि अद्ययावत झाल्याने महिलाही त्यासाठी तयार होत आहेत. त्यामुळेही सिझेरियनचे प्रमाण वाढले आहे.

आकडे काय सांगतात?

वर्ष - नॉर्मल प्रसूती - सिझेरियन


२०२१-२२ : ३५,९५७ : २३,८१७

२०२२-२३ : २८,००४ : २९,१०३

२०२३-२४ : २९,१०१ : ३४,६७२

एप्रिल २०२४ ते फेब्रु. २०२५ : २१, ६३९ : २६,८५०
 

शिक्षण, नोकरी व इतर कारणांमुळे मुलींच्या लग्नाचे वय वाढले आहे. त्यामुळे प्रसूतीचे वयही वाढले आहे. पूर्वी २० ते २२ व्या वर्षी पहिले बाळ जन्माला यायचे. आता हे वय ३० वर्षापेक्षा पुढे गेले आहे. शिवाय मुलींना प्रसूतीच्या कळा सहन करण्याची क्षमता कमी झाली आहे. काही वेळा जोखीम असल्याने सिझेरियन केले जाते. त्यामुळे प्रमाण वाढत आहे.  - मीनाक्षी देशपांडे, स्त्रीरोग तज्ज्ञ
 
महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून गरोदर महिलांना संपूर्ण सुविधा मोफत दिली जाते. याचा गरोदर महिलांनी लाभ घ्यावा. शिवाय ज्या महिला प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेस पात्र असतील, त्यांना या योजनेचा लाभ दिला जातो.
- डाॅ. राजेश दिघे, सहायक आरोग्य अधिकारी, पुणे मनपा 

Web Title: PUNE NEWS : They prefer cesarean section because they don't want any potential risks during delivery!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.