अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण:अज्ञातांनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 19:30 IST2025-04-19T19:28:14+5:302025-04-19T19:30:10+5:30
गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे खून केला

अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरण:अज्ञातांनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवला, घरालाही लावली आग
राजगुरूनगर : मांजरेवाडी धर्म (ता. खेड ) येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून अमानुषपणे दगड डोक्यात घालून खून केल्याप्रकरणी नराधम आरोपीचे घर अज्ञातांनी पेटवून देण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे मोठा अनर्थ टाळला. गावातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण, अत्याचार आणि नंतर निर्घृणपणे खून केला, ही निंदनीय घटना आहे. सर्व स्तरातून निषेध व्यक्त होत असून, आरोपीचे घर पेटविण्याचा प्रयत्न झाल्यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, आरोपीला फाशी देण्याची मागणी होत आहे.
संतापजनक घटनेनंतर शुक्रवारी (दि. १८) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी नराधम आरोपीच्या घरासमोरील ट्रॅक्टर पेटवले. घराच्या खिडकीतून आगीचे बोळे आत फेकल्याने घरातही आग लागली. यावेळी पोलिसांसह अग्निशामक दलाची गाडी दाखल झाल्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. आरोपीच्या घरासमोर दोन पोलिसांचा बंदोबस्त तैनात करत आरोपीच्या घराला संरक्षण देण्यात आले आहे. गावात सध्या तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, नराधमाला फाशी झालीच पाहिजे, नाही तर गाव शांत बसणार नाही, अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली आहे.