मृत गर्भवती महिलेला मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल चर्चेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2025 19:24 IST2025-04-04T19:23:41+5:302025-04-04T19:24:27+5:30
दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. असता तेव्हाही त्या आल्या नाहीत.

मृत गर्भवती महिलेला मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला? दीनानाथ मंगेशकर रुग्णालय समितीचा अहवाल चर्चेत
पुणे - पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर रुग्णांच्या जीवापेक्षा पैशांना प्राधान्य दिल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. २९ मार्च रोजी झालेल्या या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला. विशेष म्हणजे, तनिषा या विधान परिषदेचे आमदार अमित गोरखे यांचे स्वीय सहाय्यक सुशांत भिसे यांच्या पत्नी होत्या.
तनिषा भिसे यांना प्रसूतीपूर्व वेदना सुरू झाल्याने त्यांना तातडीने दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने उपचार सुरू करण्याआधी २० लाख रुपयांचा खर्च सांगितला आणि त्यातील १० लाख रुपये तातडीने भरण्याची अट घातली. कुटुंबीयांनी तत्काळ ३ लाख रुपये भरण्याची तयारी दर्शवली, तसेच उर्वरित रक्कम काही वेळाने भरण्याचं आश्वासन दिलं. मात्र, रुग्णालयाने पूर्ण रक्कम भरण्याच्या मागणीवर ठाम राहत, आर्थिक ऐपत नसेल तर ससून रुग्णालयात जावं, असा सल्ला दिला. या घटनेनंतर नातेवाईकांनी दीनानाथ मंगेशकर रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले होते तर आज रुग्णालय समितीकडून अहवाल सादर करण्यात आला आहे. यामध्ये अनेक धक्कादायक खुलासे करण्यात आले आहे.
आज दीनानाथ रुग्णालयाने अहवाल सादर करत आपली बाजू मांडली आहे. या अहवालात २८ मार्च च्या दुपारनंतर रुग्णाचे काय झाले याबद्दल डॉ. घैसास व रुग्णालय प्रशासन यांना काहीच कल्पना नव्हती.असेही स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णालयाची बदनामी करण्यात आल्याचा आरोपही रुग्णालयाने केला आहे. डॉक्टर घैसास ह्यांना असे वाटत होते की रुग्ण पैश्याची तजवीज करत आहे. तशी तजवीज न झाल्यास रुग्णाच्या पतीला ससून येथे जाण्याचा सल्ला दिला होता. जेणेकरून आईची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया व होणाऱ्या अपुऱ्या वाढीच्या गर्भाची शुश्रूषा ससून येतील NICU मध्ये व्यवस्थित होईल. असा सल्ला डॉक्टरांकडून देण्यात आल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.
मूल दत्तक घेण्याचा दिला होता सल्ला
रुग्णालयाने रुग्णाचे जुने केस पेपर्स, सध्याचे पेपर्स, संबंधित डॉक्टर यांचे जबाब नोंदवून घेतले. त्यानुसार सौ. भिसे ईश्वरी सुशांत (वृत्तपत्र व वाहिन्यांवर प्रसारित झालेले नाव सौ तनिषा सुशांत भिसे) MRD १०५३७६३. या २०२० पासून रुग्णालयात वेळोवेळी उपचार व सल्ला घेण्यासाठी येत होत्या. सदर महिला रुग्णाची २०२२ साली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये ५०% चॅरिटीचा लाभ घेऊन शस्त्रक्रिया झाली होती. २०२३ साली या रुग्णाला रुग्णालयातर्फे सुखरूप गर्भारपण व प्रसूती होण्याची शक्यता नसल्याने मूल दत्तक घेण्या विषयी सल्ला देण्यात आला होता. सर्व रुग्णालयामध्ये असा संकेत असतो कि आई व बाळाच्या सुरक्षिततेसाठी प्रसूतीपूर्व तपासणी (ANC) कमीत कमी ३ वेळा करून घेणे आवश्यक असते. तो त्यांनी या रुग्णालयात केला नाही व त्याची या रुग्णालयास माहिती नाही. १५ मार्च रोजी इंदिरा IVF चे रिपोर्ट घेऊन त्या डॉक्टर घैसास यांना भेटल्या. अतिशय जोखमीच्या व धोकादायक pregnancy बद्दल डॉक्टर घैसास यांनी त्यांना माहिती दिली. दर ७ दिवसांनी तपासणीस बोलावले. त्याप्रमाणे त्यांनी २२ तारखेस येणे अपेक्षित होते. परंतु तेव्हाही त्या आल्या नाहीत. असेही या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
सदर चौकशांती व रुग्णालयातील इतर सीनियर च्या ओपिनियन नुसार आमच्या समितीचा निष्कर्ष खालील प्रमाणे...
-सदर रुग्णासाठी Twin Pregnancy धोकादायक होती.
-माहितीचे रुग्णालय असून सुद्धा ANC चेकप पहिले सहा महिने रुग्णालयात आल्या नाहीत.
-आडवांस मागितल्याचा रागातून सदर तक्रार केलेली दिसते.
-रुग्णालयाचे वैद्यकीय सल्ले जसे मानले नाही तसे वैद्यकीय संचालकांनी जमेल तेवढे पैसे भरून ॲडमिट होण्याचा सल्ला पण त्यांनी पाळला नाही.
- रुग्णाच्या मृत्यूमुळे आलेली निराशा व ॲडव्हान्स मागितल्यामुळे आलेल्या रागातून ही दिशाभूल करणारे तक्रार करण्यात आली आहे असे समितीचे मत आहे.