Pune Night curfew: आजपासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी; विनाकारण घराबाहेर पडलात तर होणार कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2021 08:52 PM2021-04-05T20:52:41+5:302021-04-05T20:52:59+5:30
पुणे शहरात शनिवारपासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
पुणे : पुणे शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन महापालिकेने अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारच्या आस्थापना बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. गेले दोन दिवस संचारबंदीची अंमलबजावणी करताना पोलिसांनी जनजागृतीची भूमिका घेतली होती. मात्र, आता मंगळवारी सायंकाळी ६ वाजल्यापासून शहरात संचारबंदीची कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे, अशी माहिती सह पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.
पुणे शहरात शनिवारपासून सायंकाळी ६ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यात आता मंगळवारपासून सकाळी ७ वाजेपर्यंत वाढ केली आहे. याबाबत डॉ. शिसवे यांनी सांगितले की, लोकांना या आदेशांची माहिती व्हावी, यासाठी गेले दोन दिवस पोलिसांनी जनजागृतीवर भर दिला होता. पुणेकरांनीही या आदेशाला चांगला प्रतिसाद दिला आहे. सायंकाळी ६ वाजेपर्यंत सर्व आस्थापना दुकानदार स्वत: हून बंद करीत आहेत. कामावरुन घरी जाणार्या कोणालाही अडविण्यात येत नव्हती. त्यांच्याकडे चौकशी करुन उद्यापासून उशीर करु नये, अशा सूचना करण्यात येत होत्या.
शहरातील ९६ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणार्यांवर कारवाई करण्यात येत आहे. महापालिकेने मंगळवारपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व प्रकारची दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लोकांना आता बाहेर पडण्याचे काम राहणार नाही. त्यामुळे मंगळवारपासून सायंकाळी ६ वाजल्यापासून सकाळी ७ वाजेपर्यंत कडक संचारबंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. जे कारणाशिवाय घराबाहेर पडलेले आढळून येतील. त्यांच्यावर १८८ नुसार गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे डॉ. रवींद्र शिसवे यांनी सांगितले.
.......
गेल्या दोन दिवसात पोलीस व्हॅनवरील पी ए सिस्टीमद्वारे नागरिकांना संचारबंदीचे आवाहन केले. लोक कोणत्या कारणासाठी घराबाहेर पडले आहेत, याची चौकशी केली. त्यात प्रामुख्याने बाहेरगावांहून आलेले प्रवासी, रुग्णालयातील रुग्णांसाठी डबा घेऊन जाणारे नातेवाईक, विमानतळ, रेल्वे स्थानकावर जाणारे व येणारे प्रवासी, तसेच डॉक्टरांकडे जाणारे रुग्ण व त्यांचे नातेवाईक आढळून आले. वैध कारणे असलेल्यांना नाकाबंदीत चौकशी करुन सोडण्यात येत होते. विनाकारण बाहेर पडलेल्या काहींवर या दोन दिवसात कारवाई करण्यात आली.
...........
नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर उपाययोजनांची आवश्यकता आहे. त्यानुसार महापालिकेने आवश्यक त्या उपाय योजना आखल्या असून पोलीस संचारबंदीची अंमलबजावणी करणार आहेत. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करुन कारवाईची वेळ आणू नये.
अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे़
...........
साडेतेरा कोटी दंड वसुली
रविवारी शहरात ८१४ जणांवर विनामास्क कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून ४ लाख ८२ हजार २०० रुपयांचा दंड वसुल करण्यात आला आहे.
पुणे शहरात आतापर्यंत २ लाख ७७ हजार ९९० जणांवर विनामास्क कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून १३ कोटी ५२ लाख ८७ हजार ३०० रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.