Pune: कमळाचे चिन्ह नाही तर मतदान करणार नाही; ज्येष्ठांचा आक्रमक पवित्रा, मतदान प्रक्रिया थांबवली
By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2024 12:41 PM2024-05-07T12:41:42+5:302024-05-07T12:42:25+5:30
ज्येष्ठांची समजूत काढल्यावर त्यांनी आवडत्या उमेदवाराला मतदान केले
पुणे: संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या नणंद भावजयीतील लढतीचा फैसला बारामतीकर मतदार आज, मंगळवारी करतील. सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत होणाऱ्या मतदानानंतर दोन्ही उमेदवारांचे भवितव्य मतदान यंत्रांत बंद होऊन थेट ४ जूनला त्याचा निकाल समजणार आहे. सकाळपासूनच मतदान केंद्रांवर गर्दी झाल्याचे दिसून आले आहे. अनेकांनी कुटुंबियांसोबत मतदानाचा हक्क बजावल आहे. अशातच सणस शाळेतून एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. ज्येष्ठ नागरिक कमळाचे चिन्ह नाही म्हणून नाराज असल्याचे समोर आले आहे.
धायरी येथील सणस शाळेत मतदान केंद्रावर मतदान केंद्रावर मतदानासाठी आलेले असताना दोन ज्येष्ठ नागरिकांना कमळाचे चिन्ह दिसले नाही. त्यामुळे ते नाराज झाले. जर कमळाचे चिन्ह नाही, तर मतदान करणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला. यामुळे काही काळ मतदान प्रक्रिया थांबली होती मात्र ज्येष्ठांची समजूत काढल्यानंतर त्यांनी त्यांच्या आवडत्या उमेदवाराला मतदान केले.
बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये चुरशीची लढत होणार आहे. मागील काही दिवसात शरद पवार आणि अजित पवार यांच्याकडून जोरदार प्रचार करण्यात आला होता. बारामतीकर सुद्धा या प्रचारात सहभागी झाले होते. दोघांनी एकमेकांवर टीकाटिपणी मोठ्या प्रमाणावर केली. पण अखेर आज निवडणुकीचा तो दिवस आला आहे. बारामतीकर कोणाला साथ देणार हे आजच्या दिवसात ठरणार आहे. तर ४ जूनला निकालात विजयी उमेदवाराचे नाव कळणार आहे.
बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण मतदार २३ लाख ७२ हजार आहेत. मतदान केंद्रांची संख्या २ हजार ५१६ आहे. सर्वाधिक म्हणजे ५६१ मतदान केंद्रे भोर तालुक्यात आहेत. पुणे महापालिका क्षेत्रात या मतदारसंघाचा धनकवडी व परिसर तसेच फुरसुंगी, उरूळी ही गावे असा बराच मोठा भाग येतो. त्याची मतदारसंख्या साधारण पाच लाखांच्या जवळपास आहे.
उन्हाचा तडाखा बराच आहे. त्यातही ग्रामीण भागात उन्हाचे चटके देत आहे. त्यामुळे बहुसंख्य मतदार सकाळच्या वेळेत मतदानाला बाहेर पडतील असा अंदाज आहे. दुपारी चारनंतरही मतदान वाढेल असे प्रशासनाचे म्हणणे आहे. उमेदवारांचे कार्यकर्तेही सकाळीच मतदारांना बाहेर काढून मतदान करून घेण्याच्या प्रयत्नात आहेत.