पुण्यात स्वाइन फ्लू बळींची संख्या २५ वर
By admin | Published: March 30, 2017 03:04 AM2017-03-30T03:04:33+5:302017-03-30T03:04:33+5:30
गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे.
पुणे : गेल्या तीन महिन्यांपासून स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. शुक्रवारी एका ४५ वर्षीय व्यक्तीचा स्वाइन फ्लूने मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या २५ वर पोहोचली आहे.
शिरूर येथील रुग्णाला पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णाच्या घशातील स्रावाचे नमुने २७ मार्चला तपासणीसाठी पाठवल्यानंतर त्याच दिवशी स्वाइन फ्लूचे निदान झाले होते. त्या व्यक्तीला न्यूमोनियाचा त्रास होता. २८ मार्चला उपचारादरम्यान रुग्णाचा मृत्यू झाला. शहरात जानेवारी महिन्यापासून १४२ रुग्णांची नोंद झाली असून, २५ रुग्णांचा मृत्यू झाला. ८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले. सध्या स्वाइन फ्लूचे ३३ रुग्ण शहरांतील विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. यातील १९ रुग्णांना कृत्रिम श्वासोच्छ्वासावर ठेवण्यात आले आहे.
वातावरणात सातत्याने होणाऱ्या बदलामुळे स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव शहरात वाढताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने पुण्याला ‘हाय अलर्ट’चा इशाराही दिला आहे. नागरिकांनी किरकोळ ताप, सर्दीचा त्रास झाल्यास दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेऊन तपासणी करून घेण्याचे आवाहन महापालिकेच्या आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.